Latur: 'अधिकारी, कर्मचाऱ्याकडून त्रास होतोय', चिठी लिहून किल्लारी ठाण्यातील कर्मचारी गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:49 IST2025-11-13T17:48:34+5:302025-11-13T17:49:48+5:30
या प्रकरणी पाेलिस अधीक्षकांनी दिले चाैकशीचे आदेश

Latur: 'अधिकारी, कर्मचाऱ्याकडून त्रास होतोय', चिठी लिहून किल्लारी ठाण्यातील कर्मचारी गायब
औसा (जि. लातूर) : किल्लारी पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी दोन दिवसांपासून गायब असून, त्याने ‘सुसाईड नोट’ सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. ठाण्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याकडून त्रास हाेत असल्याचे व्हायरल नाेटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी रहेमान पटेल यांच्या कुटुंबीयांना तक्रार दाखल करण्याबाबत सांगितले आहे. शिवाय, औसा डीवायएसपींना चाैकशीचे आदेश दिले आहेत, असे पाेलिस अधीक्षक अमाेल तांबे म्हणाले.
पाेलिस कर्मचारी रहेमान पटेल हे किल्लारी पाेलिस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहेत. ते दाेन दिवसांपूर्वी कर्तव्यावरून गैरहजर आहेत. त्यांनी आत्मदहनवजा टंकलिखित तक्रार पाेलिस अधीक्षक यांच्या नावे साेशल मीडियात व्हायरल केली आहे. त्यात म्हटले आहे, मी नियमितपणे ड्यूटी करतो. मात्र, हजेरी मेजर हे मला जाणिवपूर्वक ड्यूटी लावत आहेत. चार-चार दिवस सलग दिवस-रात्र ड्युटी करूनही मला अवमानकारक वागणूक दिली जात आहे. याबाबत संबंधित ठाणेप्रमुखांना सांगितले. त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. या त्रासाला कंटाळून जीवन संपवित असल्याची नाेट सोशल मीडियावर व्हायरल केली.
औसा डीवायएसपींना चाैकशीचे आदेश दिले
दाेन दिवसांपासून गायब झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली आहे. याबाबत मिसिंगची तक्रार देण्यास सांगितले आहे. शिवाय, औसा डीवायएसपींनाही चाैकशीचे आदेश दिले आहेत.
- अमाेल तांबे, पाेलिस अधीक्षक, लातूर