लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
By राजकुमार जोंधळे | Updated: May 20, 2025 00:24 IST2025-05-20T00:21:02+5:302025-05-20T00:24:18+5:30
उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच मृत्यूने गाठले. महिलेबरोबर मुलगा आणि जावयानेही गमावला जीव.

लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
- राजकुमार जोंधळे, चाकूर (जि. लातूर)
दुचाकीवर निघालेल्या तिघांना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीने जोराची धडक दिली. यात आई, मुलगा व जावई यांचा मृत्यू झाल्याची घटना घरणी (ता. चाकूर) येथील पुलानजीक सोमवारी (१९ मे) दुपारी घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मृतांमध्ये विठ्ठल शिंदे (३४), आई यशोदाबाई शिंदे (६५) आणि जावई लालासाहेब पवार (३८) यांचा समावेश आहे.
घरणी येथील विठ्ठल शिंदे, त्यांची आई यशोदाबाई शिंदे आणि यशोदाबाई यांचे जावई लालासाहेब पवार (रा. तळेगाव घाट, ता. अंबाजोगाई) हे तिघे दुचाकीवरून (एमएच २४ बीक्यू ६८३७) घरणी येथून यशोदाबाईंना दवाखान्यात उपचारासाठी चाकूरला नेत होते.
दरम्यान, लातूरहून चाकूरकडे येणाऱ्या दुचाकीने (२६ बीएन ७०१२) पाठीमागून विठ्ठल शिंदे यांच्या दुचाकीला जोराने धडक दिली. यात लालासाहेब पवार, यशोदाबाई शिंदे, विठ्ठल शिंदे हे गंभीर जखमी झाले, तर दुसऱ्या दुचाकीवरील ज्ञानेश्वर संजय पांचाळ (रा. सांगवी) हाही गंभीर जखमी झाला.
जखमींना चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. लालासाहेब पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर यशोदाबाई शिंदे, विठ्ठल शिंदे यांचा लातुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्ञानेश्वर पांचाळ यांच्यावर लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक पंकज नीळकंठे, पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश मरपल्ले, आत्माराम केंद्रे, बसलिंग चिद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी...
चाकूर ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. ती पोलिसांनी मोकळी केली. याबाबत अद्याप तक्रार नसल्याने गुन्हा दाखल नाही.
यशोदाबाई शिंदे यांच्या पश्चात पती, मुलगा, चार मुली तर विठ्ठल शिंदे याचे पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि लालासाहेब पवार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.