Latur: जन्म-मृत्यू नोंदीसाठी तहसीलदारांच्या बनावट सह्या, शिक्के; सहा जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:55 IST2025-12-31T17:50:02+5:302025-12-31T17:55:01+5:30
जन्म-मृत्यू नोंदीसाठी तयार केले खोटे आदेश; तपासादरम्यान आतापर्यंत तब्बल ३११ बनावट दस्तऐवज उघडकीस आले आहेत.

Latur: जन्म-मृत्यू नोंदीसाठी तहसीलदारांच्या बनावट सह्या, शिक्के; सहा जणांवर गुन्हा
अहमदपूर (जि. लातूर) : अहमदपूर तहसीलदारांच्या बनावट सह्या, शिक्के तयार करून जन्म-मृत्यूच्या नोंदीचे खोटे आदेश तयार करीत शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत शेख अफरोज, निसार खुरेशी, फसाहत मीर, गौस मनियार, बिलाल मौलाना, मतिन शेख (सर्व जण रा. अहमदपूर) या सहा जणांनी संगनमत केले. त्यांनी तहसीलदारांची हुबेहूब बनावट सही तसेच कार्यालयाचे बनावट शिक्के तयार केले. या आधारे जन्म-मृत्यू नोंदी घेण्याचे खोटे आदेश तयार करून शासन व प्रशासनाची फसवणूक केली. दरम्यान, बनावट आदेश काढण्याचे लक्षात आल्यानंतर नायब तहसीलदार अभिलाष जगताप यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात वरील जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आतापर्यंत ३११ बनावट दस्तऐवज...
तपासादरम्यान आतापर्यंत तब्बल ३११ बनावट दस्तऐवज उघडकीस आले आहेत. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी सांगितले.
बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे...
तहसील कार्यालयाचे बनावट शिक्के व स्वाक्षऱ्या करून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागरिकांनी अशा बनावट कागदपत्रांपासून सावध राहावे, असे तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांनी सांगितले.