Latur: धक्कादायक! सारोळा वनात वनविभागाकडूनच वृक्षांची कत्तल; ग्रामस्थांनी ट्रक पकडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:56 IST2025-12-31T19:54:40+5:302025-12-31T19:56:05+5:30
औसा तालुक्यातील सारोळा वनातील प्रकार; वनविभागाची चोरी ग्रामस्थांनी पकडली,अधिकाऱ्यांना धरलं धारेवर

Latur: धक्कादायक! सारोळा वनात वनविभागाकडूनच वृक्षांची कत्तल; ग्रामस्थांनी ट्रक पकडला
- महेबूब बक्षी
औसा (लातूर): पर्यावरणाचे रक्षण करण्याचे कर्तव्य असलेल्या वनविभागानेच चक्क उभ्या झाडांची कत्तल करण्याचा सपाटा लावल्याचा धक्कादायक प्रकार सारोळा (ता. औसा) येथे उघडकीस आला आहे. मयत हरणांना जाळण्यासाठी आणि 'घनवन' लागवडीसाठी जागा मोकळी करण्याच्या नावाखाली शेकडो किलो वजनाची झाडे तोडली जात असताना ग्रामस्थांनी लाकडांनी भरलेला टेम्पो पकडला. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.
काय आहे नेमका प्रकार?
सारोळा गावाशेजारी ३२ हेक्टर वनक्षेत्र आहे. येथील ग्रामस्थांनी तलावाचे पाणी वापरून ही झाडे जगवली आहेत. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून वनविभागाच्या वतीने येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू होती. सोमवारी लाकडांनी भरलेला टेम्पो जात असताना सरपंच समाधान पाटील आणि ग्रामस्थांनी तो अडवला. चौकशी केली असता, मयत हरणांना जाळण्यासाठी जळण म्हणून ही लाकडे नेत असल्याचे अजब उत्तर वनविभागाच्या वतीने देण्यात आले.
वनविभागाचे परस्परविरोधी दावे
या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोते यांनी सांगितले की, 'घनवन' संकल्पनेसाठी अतिरिक्त झाडांची विरळणी करण्यात येत आहे. तर वनरक्षक महादेव मुंडे यांच्या मते, हरणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने त्यांना जाळण्यासाठी जळण म्हणून ही झाडे तोडली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या या परस्परविरोधी विधानांमुळे संशय बळावला असून, ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता सुरू असलेल्या या 'कत्तली'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रक्षकच भक्षक बनल्याची भावना
"शासन वने लावण्यासाठी कोटींचा निधी खर्च करते आणि येथे अधिकारीच उभी झाडे तोडत आहेत. जर रक्षकच भक्षक बनले तर वनांचे संरक्षण कोण करणार?" असा सवाल सरपंच समाधान पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी राहुल साळुंके, शिवपुत्र स्वामी, विलास पाटील यांच्यासह सारोळा व एरंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.