लातूर जिल्ह्यास मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, अनेक रस्ते पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:31 IST2025-08-28T11:29:00+5:302025-08-28T11:31:19+5:30
जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत असून अनेक ठिकाणच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे

लातूर जिल्ह्यास मुसळधार पावसाने पुन्हा झोडपले; पाच तालुक्यांत अतिवृष्टी, अनेक रस्ते पाण्याखाली
लातूर : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील उदगीर, रेणापूर, शिरुर अनंतपाळ आणि जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तसेच उदगीर तालुक्यातील धडकनाळ, बोरगावला पुराच्या पाण्याने वेढले आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ६२.८ मिमी पाऊस झाला आहे.
विघ्नहर्ता गणरायाबरोबर पावसाचे पुनरागमन झाले आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसाने जिल्ह्यास अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे जिकडे- तिकडे पाणीच पाणी झाले आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत असून अनेक ठिकाणच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे..
कर्नाटकातील इंचूर नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने लातूर- जहिराबाद महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सोलापूर- हैदराबाद मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील माणकेश्वर- उदगीर मार्गावरील इंद्रराळ येथील पुलावरून पाणी वाहत आहे. बोटकुळ- निलंगा मार्गावर पुल, अतनूर येथील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे उदगीर- अतनूर- बाऱ्हाळी रस्ता बंद आहे. उटी व आलमला रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. दैठणा येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अजनी- उदगीर वाहतूक बंद आहे. औसा ते हसलगण रोडवरील जवळगावाडी येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा मार्ग बंद आहे. एकंबा येथील पुलावर पाणी आल्यामुळे तोही मार्ग बंद आहे. धडकनाळ, बोरगावच्या पुलावर पाणी आल्यामुळे उदगीर- देगलूर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
रेणाचे चार दरवाजे उघडले...
रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने गुरुवारी सकाळी ११.०० वाजता रेणापूर प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच मांजरा प्रकल्पात ९९.२१ टक्के जीवंत पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
उदगीर तालुक्यात सर्वाधिक पाऊस...
गत २४ तासांत लातूर तालुक्यात सरासरी ६०, औसा- ५७.३, अहमदपूर- ६२.९, निलंगा- ५०, उदगीर- ८६.९, चाकूर- ५१.७, रेणापूर- ६४.९, देवणी- ५९.२, शिरुर अनंतपाळ- ७२.७, जळकाेट- ७७.७ मिमी पाऊस झाला आहे.