Latur: धोका टळला! मांजरा नदीच्या पुरात अडकलेले तिघे २४ तासांनंतर घरी परतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 13:35 IST2025-10-31T13:34:57+5:302025-10-31T13:35:07+5:30
लातूर-निलंगा रस्त्यावरील लोदगा गावाजवळील बिंदगीहाळ शिवारात मांजरा नदी आणि ओढ्याच्या पाण्याने दोन एकर शेताला वेढा दिला.

Latur: धोका टळला! मांजरा नदीच्या पुरात अडकलेले तिघे २४ तासांनंतर घरी परतले
लातूर : मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे बुधवारी बिंदगीहाळ शिवारात अडकलेले तिघेजण २४ तासांनंतर गुरुवारी सकाळी ७ वाजता घरी परतले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रेणा मध्यम प्रकल्पाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
२७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने मांजरा नदीला पुन्हा पूर आला. विशेषत: रेणापूर तालुक्यात अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान झाले, तर लातूर-निलंगा रस्त्यावरील लोदगा गावाजवळील बिंदगीहाळ शिवारात मांजरा नदी आणि ओढ्याच्या पाण्याने दोन एकर शेताला वेढा दिला. त्यात मधुकर श्रीपती शिंदे, दयानंद वाघंबर भोसले, महेंद्र अण्णाराव शिंदे हे तिघेजण अडकले होते. रात्री त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. तसेच तिघेही पत्र्याच्या शेडमध्ये सुरक्षित होते. त्यामुळे त्यांना तिथेच थांबण्याचा सल्ला देऊन प्रशासन आणि गावकरी त्यांच्या संपर्कात होते. दरम्यान, गुरुवारी नदी आणि ओढ्याचे पाणी कमी झाले. त्यामुळे तिघांनीही ओढ्याच्या मार्गातून कमी पाणी पाहत, वाट काढत गाव गाठले. तिघेही सुखरूप घरी पोहोचले.
जिल्ह्यात मांजरा मध्यम प्रकल्प, रेणा मध्यम प्रकल्प आणि निम्न तेरणा प्रकल्प या तिन्ही मोठ्या प्रकल्पांतून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि धरण पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने ‘मांजरा’चे गेट क्र. ३ व ४ हे दोन दरवाजे ०.२५ मीटरने कमी करण्यात आले. सद्यस्थितीत मांजरा नदीपात्रात ४९.४८ क्युमेक्स इतका विसर्ग सुरू आहे. रेणा प्रकल्पाचेही चारपैकी दोन दरवाजांतून विसर्ग कमी केला असून, त्यातून १७.८२ क्युमेक्स विसर्ग सुरू आहे. तेरणा प्रकल्पाच्याही दोन दरवाजांद्वारे २१.७१ क्युमेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.