रेणापुरात ढाब्यावर मध्यरात्री 'गँगवॉर'सारखा प्रकार! ३ वेळा हवेत गोळीबार अन् आरोपी पसार; लातूरात दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:44 IST2026-02-23T18:43:56+5:302026-02-23T18:44:19+5:30
रेणापुरात ढाब्यावर मित्रांच्या दोन गटात राडा; अंधाराचा फायदा घेत सर्वच आराेपी पळाले

रेणापुरात ढाब्यावर मध्यरात्री 'गँगवॉर'सारखा प्रकार! ३ वेळा हवेत गोळीबार अन् आरोपी पसार; लातूरात दहशत
रेणापूर (जि. लातूर) : लातूर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील रेणापूरनजीक असलेल्या पिंपळ फाटा येथे शनिवारी रात्री थरारक घटना घडली. एका 'ढाब्या'समोर मित्रांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या राड्यात एका महागड्या चारचाकीची तोडफोड करण्यात आली. अज्ञात आरोपींनी हवेत तीनवेळा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भीतीपोटी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तत्काळ बंद केली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पाेलिसांनी सांगितले, शनिवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास काही मित्र पिंपळफाटा येथील एका ढाब्यावर जेवण्यासाठी आले होते. दरम्यान, जेवणानंतर ढाब्याबाहेर पडताच, कुठल्या तरी कारणावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर बघता-बघता हिंसक हाणामारीमध्ये झाले. संतापलेल्या तरुणांनी तिथे उभ्या असलेल्या महागड्या चारचाकी वाहनावर (एमएच ४४ ए.ई़ ०००९) जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये गाडीच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोडफोड करण्यात आलेली कार पोलिसांनी जप्त करून पोलिस ठाण्यात लावली आहे. या थराराक घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांत, स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत असून, या वादाचे नेमके कारण काय होते? याचाही ते तपास करत आहेत. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हवेत गोळीबार अन् आरोपी झाले पसार?
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, हाणामारी सुरू असतानाच एकाने जवळ असलेली बंदूक काढून रस्त्यावर हवेत तीन वेळा गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. राडा करणारे सर्व तरुण घटनेनंतर तातडीने अंधाराचा फायदा घेत पसार झाले. हे तरुण लातूर आणि परळी वैजनाथ भागातील असल्याचे बोलले जात आहे.
गाेळीबार झाल्याची चर्चा; तपासानंतरच स्पष्ट हाेणार
‘पिंपळ फाटा येथील ढाब्यासमोर मित्रांमध्ये हाणामारी होऊन कारचे नुकसान झाले. हवेत गोळीबार झाल्याची चर्चा असली तरी, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासणीनंतरच गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा देता येईल. आम्ही सर्व बाजूने तपास करत आहोत.’
- विपिन मामडगे, अंमलदार, पाेलिस ठाणे, रेणापूर.