बारावीचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनीने सोडले घर; देवणी पोलिसांनी अक्कलकोटमधून २ तासांत शोधले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:28 IST2026-03-07T12:27:55+5:302026-03-07T12:28:24+5:30
देवणी ते अक्कलकोट... असा लागला शोध

बारावीचा पेपर कठीण गेल्याने विद्यार्थिनीने सोडले घर; देवणी पोलिसांनी अक्कलकोटमधून २ तासांत शोधले
देवणी बु. (जि. लातूर) : परीक्षेतील एखादा कठीण गेलेला बारावीचा पेपर आणि मनावर आलेले प्रचंड दडपण... एका क्षणी या तणावाने इतके टोक गाठले की, एका अल्पवयीन मुलीने स्वतःचे घर सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. घरच्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता, अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची भीती मनात दाटली होती. मात्र, देवणी (बु.) पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि ‘खाकी’मधील माणुसकीमुळे अवघ्या दोन तासांमध्ये या मुलीचा शोध लागला. तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यानंतरच सर्वांचा जीव भांड्यात पडला.
पाेलिसांनी सांगितले की, देवणी पोलिस ठाण्यात गुरुवार, दि. ५ मार्च राेजी एक हतबल बाप दाखल झाला. त्याने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. ‘कुणीतरी माझ्या लेकीला पळवून नेले,’ असा संशय व्यक्त करीत असताना त्यांच्या डोळ्यांतील पाणी पोलिसांना बरंच काही सांगून जात होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, डीवायएसपी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
अक्कलकाेट येथे श्री स्वामी
समर्थांच्या दरबारात लागला शोध...
सहायक पोलिस निरीक्षक भीमराव गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध सुरू केला. तपासाचे धागेदोरे थेट सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटपर्यंत पोहोचले. ती मुलगी स्वामी समर्थांच्या दारी पाेहोचली हाेती. देवणी पोलिसांनी तातडीने अक्कलकोट पोलिसांशी संपर्क साधला अन् अवघ्या दोन तासांमध्ये तिला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. तपास पोहेकाॅ. आर.जी. लामतुरे करीत आहेत.
यशापेक्षा आयुष्य खूप मोठे आहे;
पालकांनाे, मुलांना विश्वासात घ्या !
जेव्हा मुलीची विचारपूस झाली, तेव्हा समोर आलेले सत्य अस्वस्थ करणारे होते. बोर्डाचा पेपर कठीण गेल्यामुळे निर्माण झालेला प्रचंड मानसिक तणाव आणि भीतीपोटी तिने घर सोडले होते. ‘आई-वडील काय म्हणतील?’ अथवा ‘लोकांना काय तोंड दाखवू?’ या विचाराने ती हतबल झाली होती. आज मुलगी आपल्या घरात सुखरूप आहे. ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे. गुणांच्या शर्यतीत आपण आपल्या मुलांच्या मनाचा कानोसा घ्यायला विसरत तर नाही ना? पेपर कठीण गेला तरी आयुष्य संपत नाही, हा विश्वास मुलांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी आज प्रत्येक पालकाची आहे.