Latur: हगदळ शिवारात गांजाची लागवड; नऊ किलो गांजा जप्त, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:11 IST2025-06-13T18:10:45+5:302025-06-13T18:11:25+5:30
१ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल : अहमदपूर तालुक्यात पोलिसांची कारवाई

Latur: हगदळ शिवारात गांजाची लागवड; नऊ किलो गांजा जप्त, एकाला अटक
लातूर : पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि अहमदपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत तब्बल १ लाख ३७ हजार ७७५ रुपये किमतीचा नऊ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. ११ जून २०२५ रोजी रात्री अहमदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हगदळ गावाच्या शिवारात गांजाची लागवड केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर आणि अहमदपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ छापा टाकला.
हगदळ शिवारातून गांजाचे झाड जप्त
हगदळ गावाच्या शिवारातील राजू ऊर्फ देवराव मुंडे (वय ३२, रा. हगदळ, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांच्या शेतातून पोलिसांनी नऊ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शेतमालक राजू ऊर्फ देवराव मुंडे याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर आणि अहमदपूरचे पोलिस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पथकात पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव, सहायक फौजदार दिंडगे, तसेच पोलिस अंमलदार तुराब पठाण, चौधरी, कछवे, मदने, केंद्रे, सूर्यवंशी आणि मुंडे यांचा समावेश होता.