युद्धामुळे जलमार्ग बंद; लातूरच्या शेतकऱ्यांचा कोट्यवधीचा माल बंदरावरच, आर्थिक उलाढाल ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:54 IST2026-03-05T17:54:38+5:302026-03-05T17:54:50+5:30
आखाती देशांचा जलमार्ग बंद झाल्याने शेतकरी हवालदिल; अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, दुबईची सागरी वाहतूक बंद

युद्धामुळे जलमार्ग बंद; लातूरच्या शेतकऱ्यांचा कोट्यवधीचा माल बंदरावरच, आर्थिक उलाढाल ठप्प
लातूर : अमेरिका, इस्त्रायल-इराण युद्धाचा परिणाम जागतिक व्यापारावर झाला आहे. लातुरातील निर्यातीलाही फटका बसला आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा चना, मका, सोयाबीन डीओसी दुबई आणि मुंबईच्या बंदरावर अडकून पडली आहे. जवळपास ९५० टन शेतमाल जागेवरच राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे निर्यातदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
लातूर जिल्ह्यातून कृषी उत्पादनांची जगाताील विविध देशांमध्ये निर्यात होते. मात्र, गत आठवड्यापासून अमेरिका, इस्त्रायल-इराण या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्याचा मोठा परिणाम निर्यातीवर झाला आहे. २८ फेब्रुवारीपासून काबुली चना, मका, सोयाबीन डीओसी निर्यात बंद झाली आहे. अफगानिस्तान, उझबेकिस्तान, दुबईला सागरीमार्गाने होणारी शेतमालाची वाहतूक बंद असल्याने मुंबईतील बंदरावर जवळपास ८०० टन शेतमाल पडून आहे. याशिवाय, दुबईतील बंदरावर १५० टन कृषी उत्पादन अडकून पडले आहे. तेथील खरेदीदारांनी हा माल न उचलल्याने चिंता वाढली आहे.
लातुरातून २० देशांत कृषी उत्पादने
लातूर जिल्ह्यातून यूएसए, इटली, चीन, थायलंड, दुबई, कुवेत, अफगानिस्तान, उझबेकिस्तान अशा २० देशांत कृषी उत्पादनांची निर्यात होते, असे येथील निर्यातदार श्रीहरी काल्या यांनी सांगितले. त्यांच्याशिवाय आणखीन एक-दोन निर्यातदार जिल्ह्यात आहेत. इस्त्रायल-अमेरिका-इराण संघर्षामुळे आखातील देशातील व्यापार ठप्प झाला आहे. युरोपीय राष्ट्रांत निर्यात सुरू आहे.
चिंता वाढली
विदेशात निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनांसाठीची काही अनामत रक्कम मिळाली आहे. उर्वरित रक्कम कृषी उत्पादन पोहोचल्यानंतर मिळणार आहे. मात्र, जलमार्ग बंद असल्याने माल पोहोचविता येत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.
- श्रीहरी काल्या, निर्यातदार.
द्राक्ष निर्यातही थांबली
जिल्ह्यातून युरोप आणि आखाती देशांमध्ये द्राक्षाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात निर्यात होते. दरवर्षी जवळपास ३०० ते ४०० टन द्राक्ष विदेशात जातात. सध्या द्राक्ष हंगामास सुरुवात झाली असून, तो एप्रिलअखेरपर्यंत असतो. आता जवळपास १० कंटेनर द्राक्ष निर्यात झाली आहे. मात्र, मंगळवारपासून मुंबईच्या बंदरातून इराण, दुबईकडे जाणारे जलमार्ग बंद झाले आहेत. परिणामी, द्राक्ष निर्यात थांबली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांना मोठा फटका
जिल्ह्यातील काही शेतकरी विदेशात द्राक्ष निर्यात करतात. मात्र, युद्धामुळे इराण, दुबईकडे होणारी द्राक्ष निर्यात थांबली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.
- राजाराम जाधव, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.