पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 20:38 IST2025-04-25T20:37:25+5:302025-04-25T20:38:53+5:30
भारताने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानला २-० ने दिली मात

पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
महेश पाळणे, लातूर: खेळ कोणताही असो, भारत-पाकिस्तान सामना म्हटले की, टशन आलेच. क्रिकेट खेळात तर हा सामना प्रत्येक भारतीयांचे लक्ष वेधतो. सध्या थायलंड येथे एशियन महिला चॅम्पियनशीपच्या पात्रता फेरीचे आंतरराष्ट्रीय सामने सुरू असून गुरुवारी भारताने अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानला २-१ ने मात दिली. या सामन्यात लातूरच्या बेसबॉलपटू ज्योती पवारची खेळी निर्णायक ठरली. विजयानंतर ज्योतीने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा राग मनात धरून खेळी केल्याचे सांगत हा विजय मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना समर्पित केला.
थायलंड येथील बँकाॅक येथे महिलांच्या आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा सुरू असून ॲम्युच्युअर बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने भारतीय महिला संघ या स्पर्धेसाठी दाखल झाला आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, इराण, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड व कंबोडिया अशा दहा संघांनी सहभाग नोंदविला असून भारताने शुक्रवारपर्यंत सलग तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
५ व्या इनिंगपर्यंत स्कोअर बरोबर...
बेसबॉल खेळात ७ इनिंगचा सामना असतो. मात्र, ५ व्या इनिंगपर्यंत भारत व पाकिस्तानचा स्कोअर शून्य होता. ६ व्या इनिंगला लातूरच्यास ज्योतीच्या हिटवर एक रन मिळाला. ७ व्या इनिंगला पुन्हा पाकिस्तानने एक रन घेत बरोबरी साधली. सामना बरोबरीत असल्याने पुन्हा पंचाकडून दोन इनिंग वाढविण्यात आल्या. ८ वी इनिंगही बरोबरीत असल्याने ९ व्या राऊंडला ओडिसाच्या धरितत्रीने धाव घेत भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात भारताने २-१ अशी बाजी मारली. यात लातूरच्या ज्योती पवारची कलेक्शन व हिटिंग, पुण्याच्या रेश्मा पुणेकरची पिचिंग व धरितत्रीची उत्कृष्ट खेळी भारताला विजय मिळवून देणारी ठरली. तत्पूर्वी भारताने श्रीलंकेचा १५-४ तर इराणचा १३-० असा एकतर्फी धुव्वा उडविला.
गरिबीतून आली ज्योती पुढे...
यापूर्वी ज्योतीने दोनदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविला असून पहिल्यावेळी या स्पर्धेसाठी राजर्षी शाहू महाविद्यालय व लातूरच्या रोटरी क्लबने आर्थिक मदत केली होती. दुसऱ्या स्पर्धेतही माजी आ. धीरज देशमुख, आ. रमेश कराड व रोटरी क्लबने मदत केली आहे. आताही स्पर्धेसाठी तिच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा माजी आ. धीरज देशमुख यांनी तिला मदत करीत स्पर्धेसाठी पाठविले.
आमचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. यापेक्षा पाकिस्तानला पराभव करीत आम्ही पुढे गेलो, याचा आनंद आहे. पहलगाम येथील हल्ल्याचा राग मनात होता. खेळाने या भावना जिवंत ठेवत विजय साकार केला. हा विजय मयत निष्पाप लोकांना समर्पित करीत आहे.
- ज्योती पवार, आंतरराष्ट्रीय बेसबॉलपटू