लातुरात बाप-लेकीला भरधाव हायवाने चिरडले, दोघेही जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:57 IST2022-01-31T11:56:57+5:302022-01-31T11:57:45+5:30
या अपघातात दोघेही जागीच ठार झाले आहेत. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

लातुरात बाप-लेकीला भरधाव हायवाने चिरडले, दोघेही जागीच ठार
लातूर : जिल्ह्यातील शिवणी- पेठ येथून लातूरकडे मुलीला शाळेत सोडण्यासाठी मोटरसायकवर येणाऱ्या बाप-लेकीला हायवाने चिरडल्याची घटना बाभलगाव नाका परिसरात सोमवारी सकाळी घडली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले आहेत. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले, शिवणी- पेठ येथील रहिवासी असलेले शिक्षक दत्तात्रय कोंडीबा पांचाळ (३८) आणि प्रतीक्षा दत्तात्रय पांचाळ (१३) हे लातूरसाठी जिजामाता विद्यालयात आपल्या मोटारसायकलवरून (एम.एच. २४ बी.एच. ४१०९) सोमवारी सकाळी येत होते. दरम्यान, लातूर शहरानजीक म्हाडा कॉलनी, बाभळगाव नाका परिसरात त्यांच्या मोटारसायकलला भरधाव हायवा वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघे बाप-लेक जागीच ठार झाले. प्रतीक्षा ही इयत्ता आठवीत होती. वडील तीला रोज शाळेत सोडण्यासाठी येत होते. मयत दत्तात्रय पांचाळ हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. अपघातानंतर हायवाचलक घटनास्थळावरुन पसार झाला. घटनास्थळी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. हायवा चालकाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.