- हणमंत गायकवाडलातूर : लातूर महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जात असतानाच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे लातूरच्या राजकीय वातावरणात मोठी ठिणगी पडली आहे. विलासरावांच्या आठवणी लातूरमधून पुसून काढू, या विधानाचा समाचार घेत लातूरकरांनी सामाजिक माध्यमांतून चव्हाणांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
सोमवार, दि. ५ जानेवारी रोजी लातूर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांचा उल्लेख केला. ‘विलासरावांच्या लातूरमधील आठवणी पुसून काढल्या जातील’, असे विधान त्यांनी केले. या विधानामुळे केवळ काँग्रेसच नव्हे, तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
'पक्ष कोणताही असो, साहेब आमची शान'..!या विधानानंतर सोशल मीडियावर 'विलासराव देशमुख' हा विषय ट्रेंडिंगमध्ये आला असून, कार्यकर्त्यांनी चव्हाणांना थेट आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, यात सर्वपक्षीय स्थानिक कार्यकर्त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.
नेटिझन्सनी दिलेल्या काही प्रमुख प्रतिक्रिया..!
आमच्या श्वासात साहेब आहेत, हिंमत असेल तर काढून दाखवा !
विलासराव देशमुख हे केवळ एका पक्षाचे नव्हे, तर महाराष्ट्राची आणि लातूरची शान होते."’हे विधान म्हणजे सत्तेचा अहंकार आहे.’
दिलदार नेतृत्वाचा आदर..!विलासराव देशमुख यांनी कधीही संकुचित राजकारण केले नाही, त्यांनी लातूरला देशाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले, अशा भावना लातूरकरांनी व्यक्त केल्या आहेत. ‘विलासराव’ शहरापुरते मर्यादित नसून ते देशाचे नेते होते. त्यांना लातूरकरांच्या मनातून पुसणे केवळ अशक्य आहे," असा सूर सर्वत्र उमटत आहे.
लातूरची संस्कृती, सनदशीर मार्गानेच प्रतिक्रिया..!भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलेले विधान कोणत्याच लातूरकरांना पसंत पडणारे नाही, अशी प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी आमची संस्कृती सनदशीर मार्गानेच प्रतिक्रिया देण्याची आहे, असेही सुनावले आहे.विलासराव देशमुख हे आमचे दैवत आहेत. त्यांचीच शिकवण आहे, कोणी व्यक्तिगत टीका केली तर संयमाने आपली भूमिका मांडायची. लोकनेत्यांच्या आठवणी विसरणे शक्य नाही.चुकीचे बोलल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. परंतु, आम्ही त्यावरची प्रतिक्रिया ही तितकीच संयमाने देतो, हीच लातूरची राजकीय संस्कृती आहे, अशा प्रतिक्रियाही माध्यमांवर उमटत आहेत.
निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले..!महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या वादामुळे आता भाजप विरुद्ध इतर सर्व असा संघर्ष पाहायला मिळत आहे. विकासाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा आता थेट लातूरच्या अस्मितेवर येऊन पोहोचली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या या विधानाचा फटका आगामी निवडणुकीत भाजपला बसणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
Web Summary : BJP leader Ravindra Chavan's statement about erasing Vilasrao Deshmukh's memory sparked outrage in Latur. Residents across party lines protested, asserting Deshmukh's enduring legacy and contribution to Latur's identity. The controversy heated up the pre-election environment.
Web Summary : भाजपा नेता रवींद्र चव्हाण के विलासराव देशमुख की स्मृति मिटाने के बयान से लातूर में आक्रोश है। पार्टी लाइनों से ऊपर उठकर निवासियों ने देशमुख की स्थायी विरासत और लातूर के योगदान की पुष्टि की। विवाद ने चुनाव पूर्व माहौल गरमा दिया।