सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी केल्याने व्यत्यय; मुख्यमंत्री म्हणाले,'दादा, राजकारण नको!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 19:03 IST2025-09-24T18:09:56+5:302025-09-24T19:03:27+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेली विदारक परिस्थिती पाहून शेती, जमिनी, घरे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले.

सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी केल्याने व्यत्यय; मुख्यमंत्री म्हणाले,'दादा, राजकारण नको!'
औसा (धाराशिव): मराठवाड्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी येथे नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, संवाद साधताना सातत्याने ‘ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी द्या’, अशी मागणी करत व्यत्यय आणणाऱ्या एका शेतकऱ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “ऐ दादा गप्प बस, राजकारण करू नकोस!” असे म्हणत ठणकावले.
निकष बाजूला ठेवून मदत करणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेली विदारक परिस्थिती पाहून शेती, जमिनी, घरे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले, “आम्ही कसलेही निकष न लावता वाढीव आणि सरसकट मदत करणार आहोत.” त्यांनी मदतीची घोषणा केवळ कागदावर राहणार नाही, तर पहिल्या हप्त्याचे पैसे कालच जमा झाल्याचेही स्पष्ट केले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही उपस्थित शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी ‘ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी द्या’ या मागण्यांचा पुनरुच्चार केला. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही मागण्यांवर काहीही बोलणे टाळले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यासह अनेक आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
'पंजाबच्या धर्तीवर मदत द्या'
यावेळी उपस्थित असलेले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सरकारवर टीका केली. “तुम्हीच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करत होता, आता राज्यात तुमचे बहुमताचे सरकार असताना अशा घोषणा का? हीच खरी वेळ आहे कर्जमुक्तीची, ती तुम्ही करा,” असे ते म्हणाले. पंजाबसारख्या लहान राज्याने प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याने उशीर का, असा सवाल त्यांनी विचारला. “आम्ही तुमच्या घोषणेची वाट पाहत आहोत, अन्यथा आमच्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी लढा देऊ,” असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.