हेराफेरी! आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा, लातूर झेडपीतील चौघे निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:54 IST2025-08-07T17:54:17+5:302025-08-07T17:54:41+5:30
जिल्हा परिषदेच्या सीईओंची कारवाई

हेराफेरी! आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा, लातूर झेडपीतील चौघे निलंबित
लातूर : कर्मचाऱ्याचे वेतन त्रयस्थ व्यक्तीच्या खात्यावर जमा करीत हेराफेरी केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आरोग्य विभागातील चार कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे. तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र व २५२ उपकेंद्र आहेत. जिल्ह्यातील एका प्राथमिक आराेग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याने आपले मासिक वेतन जमा झाले नसल्याची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे शुक्रवारी तक्रार केली होती. त्याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी तत्काळ दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या तपशिलाची पडताळणी केली. तेव्हा संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन त्रयस्थ व्यक्तीच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्याची गंभीरपणे दखल घेत प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या चौघांना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्याकडे सादर केला. सीईओ मीना यांनी सोमवारी चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
१२ लाख ३० हजार परस्पर वळविले
प्रथमदर्शनी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक लेखा अधिकारी पवनकुमार वाघमारे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने सीईओंनी वाघमारे तसेच या प्रकरणात अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील शाखा सहायक सी. एम. थेटे, एम. बी. राऊ आणि निरंजन पाटील यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात वाघमारे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे कबूल करीत शासनाच्या खात्यावर १२ लाख ३० हजार ८७० रुपये जमा केले आहेत. या प्रकरणात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
चौघांची समिती स्थापन
जिल्ह्यात अशा प्रकारे आणखीन अनियमितता आहे की काय हे पाहण्यासाठी चौघांची समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई होणार आहे. वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा केल्याचे निदर्शनास आल्याने चौघांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिवाय, चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी.