"मोदींना उधारीवर गोपीनाथ मुंडेंना दिलं होतं, मुख्यमंत्री बनवणार होतो"; फडणवीसांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:04 IST2025-08-11T18:50:05+5:302025-08-11T19:04:47+5:30

गोपीनाथ मुंडेंची स्वप्ने पूर्ण करणार, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प: देवेंद्र फडणवीस

"Gopinath Munde was given on loan to Modi, we was going to make him the Chief Minister"; CM Devendra Fadnavis's secret revelation | "मोदींना उधारीवर गोपीनाथ मुंडेंना दिलं होतं, मुख्यमंत्री बनवणार होतो"; फडणवीसांचा गौप्यस्फोट

"मोदींना उधारीवर गोपीनाथ मुंडेंना दिलं होतं, मुख्यमंत्री बनवणार होतो"; फडणवीसांचा गौप्यस्फोट

लातूर : मराठवाड्याच्या राजकीय इतिहासात अमिट ठसा उमटवणारे दोन मित्र  स्व. गोपीनाथ मुंडे आणि स्व. विलासराव देशमुख आता स्मारकांच्या रूपाने पुन्हा एकत्र आले आहेत. लातूर शहरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच ठिकाणी आधीपासूनच स्व. विलासराव देशमुख यांचा पुतळा असल्याने, "हा मैत्रीचा अद्वितीय संगम आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुढील पाच वर्षे मराठवाड्याच्या विकासाची गती वाढवून मुंडे साहेबांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

भाषणाच्या सुरुवातीला फडणवीस यांनी मुंडे साहेबांविषयी आदर व्यक्त करत त्यांच्या राजकीय संघर्षाची, कार्यपद्धतीची आणि लोकांशी असलेल्या नात्याची आठवण करून दिली. "मी भाग्यवान आहे की, हा पुतळा माझ्या हस्ते अनावरण करण्याची संधी मला मिळाली," असे ते म्हणाले.

"मोदींना उधारीवर दिले होते, मुख्यमंत्री बनवणार होतो"
2014 च्या निवडणुकीतला एक किस्सा सांगताना फडणवीस म्हणाले, "त्या वेळी मी नेहमी म्हणायचो – मोदींना उधारीवर मुंडे साहेब दिले आहेत, विधानसभा आली की त्यांना मुख्यमंत्री बनवणार. दुर्दैवाने ते शक्य झाले नाही." तसेच मुंडेंनी "देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र" असा उल्लेख केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

मुंडे साहेबांचा पाण्यासाठी लढा
मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न मुंडे साहेबांचे होते, ते आपण पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही फडणवीसांनी दिले. "पूर्वी मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळवून नेण्यात आले होते, ते आम्ही परत आणले. बीडपर्यंत पाणी पोहोचले आहे, पुढील पाच वर्षांत 100 टक्के शेतरस्ते पक्के करू," असे ते म्हणाले. लातूरच्या पाणीपुरवठा योजना आणि सामान्य रुग्णालयाला मान्यता दिल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली.

अंडरवर्ल्डला थेट आव्हान
मुंडे साहेब गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डचा नायनाट करण्यासाठी मकोका कायदा आणला. "1990 च्या दशकात दाऊदच्या दहशतीच्या काळात, सभागृहात उभं राहून त्याला आव्हान देण्याचे धाडस मुंडे साहेबांनी दाखवले," असे फडणवीस म्हणाले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना ते राजीनामा घेतल्याशिवाय बसत नसत, ही त्यांची खास कार्यशैली असल्याचे त्यांनी नमूद केले.

"सत्तेशी समझोता करू नको" : मुंडेंची शिकवण
"मी त्यांच्याकडून शिकलो की, सत्ता आपल्याला अनेक आमिष दाखवते पण सत्तेशी संघर्ष करायला शिक, कधी समझोता करू नको. म्हणूनच मी आजपर्यंत सत्तेशी समझोता केला नाही," असे फडणवीस म्हणाले. पदावर नसतानाही लोकनेते म्हणून टिकून राहणे हेच मुंडेंचे वैशिष्ट्य होते, असे ते म्हणाले.

Web Title: "Gopinath Munde was given on loan to Modi, we was going to make him the Chief Minister"; CM Devendra Fadnavis's secret revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.