प्रॉपर्टी नावावर कर म्हणून तगादा; वैतागून तरुणाने संपवले जीवन
By हरी मोकाशे | Updated: March 25, 2023 15:49 IST2023-03-25T15:49:19+5:302023-03-25T15:49:38+5:30
आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल

प्रॉपर्टी नावावर कर म्हणून तगादा; वैतागून तरुणाने संपवले जीवन
उदगीर : शहरातील एका ३५ वर्षीय व्यक्तीस त्याच्या नावावरील प्रॉपर्टी आरोपींनी स्वतःच्या नावावर करण्याच्या उद्देशाने सतत त्रास देत दिल्याने सदर व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आणि त्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलिसांत सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश रामलिंग पंचाक्षरी (३५, रा. साईनगर, उदगीर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहराच्या बिदर गेटजवळील साईनगर भागातील शैलेश रामलिंग पंचाक्षरी (३५) याने बुधवारी सायंकाळी स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तेव्हा मयताच्या डावे बाजूच्या खिशात चिठ्ठी आढळली. त्यात आरोपी शिवा आठाने, बागवान पटेल, बाळू बिरादार, करण कांबळे, राहुल गायकवाड, किरण भोसले (कांबळे), संजय देशमुख यांनी प्रॉपर्टी नावावर करून घेण्याच्या उद्देशाने त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिल्याचे आढळले.
दरम्यान, मयताचे वडील रामलिंग पंचाक्षरी यांनी गुरुवारी रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन वरील आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत.