दुबार पेरणीनंतरही उत्पन्नाची आशा मावळली; हताश शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
By हरी मोकाशे | Updated: August 25, 2022 18:03 IST2022-08-25T18:02:44+5:302022-08-25T18:03:11+5:30
सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय.

दुबार पेरणीनंतरही उत्पन्नाची आशा मावळली; हताश शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या
किल्लारी (जि. लातूर) : दुबार पेरणी करुनही शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा कमी झाल्याने औसा तालुक्यातील सारणी येथील एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे.
भागवत महादेव हावलदार (४५, रा. सारणी, ता. औसा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सारणी येथील भागवत हावलदार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी यंदाच्या खरीपात दुबार पेरणी केली. परंतु, सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले. अशा परिस्थितीत पत्नीची शस्त्रक्रियेचे संकट आले. त्यातच मुलगी उपवर झाली. तसेच मुलांचे शिक्षण कसे करावे, म्हणून ते चिंताग्रस्त झाले होते. दरम्यान, त्यांनी गुरुवारी सकाळी ७ वा. पूर्वी घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. मरडे करीत आहेत.