दबदबा कायम! राज्यात दहावीत शंभर टक्के गुण घेणारे ५० टक्के विद्यार्थी लातूरचेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 19:24 IST2025-05-14T19:23:25+5:302025-05-14T19:24:16+5:30
बावन्नकशी सोन्याने निकालाची परंपरा कायम ठेवून लातूरचा लौकिक वाढविला आहे.

दबदबा कायम! राज्यात दहावीत शंभर टक्के गुण घेणारे ५० टक्के विद्यार्थी लातूरचेच
लातूर : राज्यात दहावी बोर्ड परीक्षेत २११ विद्यार्थ्यांनी शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळविले असून त्यात लातूर विभागातील ५० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तब्बल ११३ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून लातूर पॅटर्नचा दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. हाती आलेल्या निकालानुसार लातूर शहरातील श्री केशवराज विद्यालयातील १३, देशीकेंद्र १०, सरस्वती विद्यालय ५, सोमाणी, स्वामी विवेकानंद आणि जिजामाता कन्या प्रशालेतील प्रत्येकी २, परिमल आणि विद्याविकास विद्यालयातील विद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याने शंभर टक्के गुण मिळवून लातूरचा लौकिक वाढविला आहे.
दहावी परीक्षेसाठी लातूर विभागातून १ लाख ५ हजार ६१९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी ९७ हजार ९९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.७७ टक्के आहे. एकूण मुलांपैकी ५१ हजार ६९९ मुले पास झाली असून ४६ हजार २९१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.४७ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.४९ टक्के आहे. लातूर विभागात लातूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून जिल्ह्याचा निकाल ९२.२६ टक्के लागला आहे. धाराशिव जिल्हा विभागात प्रथमस्थानी असून ९५.३७ आणि नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर असून ९१.९३ टक्के निकाल लागला आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार ६९८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणीत ३२ हजार ३३५, द्वितीय श्रेणीत २४ हजार २८० आणि पास श्रेणीत ७ हजार ६७७ विद्यार्थी आहेत.
४४६ शाळांचा शंभर टक्के निकाल
लातूर विभागात ४४६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. १० शाळांचा शून्य टक्के निकाल लागला असून ९० ते ९९ टक्के निकाल लागलेल्या ७७१ शाळा आहेत. तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतलेले ७ हजार ३७८ विद्यार्थी आहेत.
बावन्नकशी सोनं
शंभरपैकी शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर शहरातील विद्यार्थी सर्वाधिक आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार तब्बल ४५ विद्यार्थी एकट्या लातूर शहरातील आहेत. या बावन्नकशी सोन्याने निकालाची परंपरा कायम ठेवून लातूरचा लौकिक वाढविला आहे. ज्या शाळांच्या निकालाचा आलेख दरवर्षी वाढत आहे, त्या लातूर शहरातील शाळांनी यावर्षीच्या निकालात ही आपला दबदबा कायम ठेवला आहे, असे या निकालावरून स्पष्ट होते.