नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन सरसकट पीकविमा लागू करावा, शेतकरी संघटनेचा रास्तारोको
By हरी मोकाशे | Updated: September 5, 2023 13:23 IST2023-09-05T13:22:56+5:302023-09-05T13:23:10+5:30
शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन सरसकट पीकविमा लागू करावा, शेतकरी संघटनेचा रास्तारोको
वलांडी : पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ नैसर्गिक आपत्ती जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा लागू करावा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी देवणी तालुक्यातील वलांडी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
हे रास्तारोको आंदोलन येथील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, तालुकाध्यक्ष सुरेंद्र अंबुलगे यांच्या नेतृत्वाखाली उदगीर- निलंगा राज्यमार्गावर करण्यात आले. यावेळी माजी आ. धर्माजी सोनकवडे, व्यापारी कमिटीचे अध्यक्ष उमाकांत नागलगावे, रामविलास बंग, विलास वाघमारे, मालबा घोणसे, ज्ञानेश्वर भोसले, विवेक पाटील यांची भाषणे झाली. शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी बालाजी केंद्रे, महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण डपलवाड, देविदास किवंडे, लामतुरे यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
दोन तास आंदोलन...
शेतकरी संघटनेच्यावतीने दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बँकांनी शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवावी. बारा तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा. ई- पीक पाहणीची अट तात्काळ रद्द करावी. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.