लातुरात गाेव्याची दारु जप्त; दाेघा आराेपींना केली अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: April 24, 2025 02:29 IST2025-04-24T02:27:14+5:302025-04-24T02:29:51+5:30
राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, वाहनासह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त...

लातुरात गाेव्याची दारु जप्त; दाेघा आराेपींना केली अटक
लातूर : चाेरट्या मार्गाने गाेवा राज्यातील दारुची वाहतूक करताना दाेघांना वाहनांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारुसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रात्र उशिरा करण्यात आली आहे. याबाबत दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गाेवा राज्यात निर्मिती झालेली विदेशी दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे पथकाने पाळत ठेवत रात्री उशिरा दाेघांना ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता विदेशी दारुचा साठा आढळून आला. यावेळी दुचाकीसह समाधान ज्ञानाेबा डावळे (वय ३० रा. रेणापूर) आणि शंकर बालाजी गालफाड (वय २७ रा. पानगाव ता. रेणापूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून १८० मीलि क्षमता असलेल्या गाेवा राज्य निर्मितीच्या तब्बल ३ हजार ६४९ विदेशी दारु बाटल्या जप्त करण्यात आल्या. दारुचे ७६ बाॅक्स, दाेन दुचाकी (एम.एच. १३ सी.एफ. ७७३९ आणि एम.एच. २४ ए.व्ही. १४६७) असा एकूण ८ लाख ६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डाॅ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच नांदेड विभागाचे विभागीय उपआयुक्त बी.एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर येथील अधीक्षक केशव गाे. राऊत, प्रभारी अधीक्षक तथा उपाधीक्षक एम.जी. मुडपे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर येथील निरीक्षक यू.व्ही. मिसाळ, दुय्यम निरीक्षक एस.आर. राठाेड, एस.के. वाघमारे, एन.डी. कचरे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन हाेळकर, जवान अनिरुद्ध देशपांडे, भरत गायकवाड, बळी साखरे, ऋषी चिंचाेलीकर, हणमंत माने यांच्या पथकाने केली.