लातूरमध्ये कॉंग्रेसला फटका! माजी महापौर 'विक्रांत' नंतर उपमहापौर 'चंद्रकांत' राष्ट्रवादीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:00 IST2025-12-11T14:58:24+5:302025-12-11T15:00:02+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथे प्रवेश; लातूरच्या राजकीय समीकरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये कॉंग्रेसला फटका! माजी महापौर 'विक्रांत' नंतर उपमहापौर 'चंद्रकांत' राष्ट्रवादीत!
लातूर : शहर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) लातूर शहरात आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढवत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या पाठोपाठ आता माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने लातूरच्या राजकीय समीकरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
विक्रांत गोजमगुंडे यांच्या पुढाकाराने लातूरच्या राजकारणाला नवी दिशा मिळत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या राजकारणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता लक्ष केंद्रित केल्याचे या प्रवेशावरून स्पष्ट होत आहे. अनुभवी आणि मनपात एक-दोन टर्म नगरसेवक राहिलेल्या नेत्यांचा गट आधीच राष्ट्रवादीसोबत होता, त्यातच काँग्रेस पक्षाचे हे दोन बडे नेते राष्ट्रवादीत सामील झाल्याने पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे.
चंद्रकांत बिराजदारांचा ''राष्ट्रवादी''त प्रवेश
बुधवारी नागपूर येथे लातूर महापालिकेचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा स्कार्फ परिधान करून त्यांचे पक्षात स्वागत केले. एकापाठोपाठ एक प्रभावशाली नेत्यांचा झालेला हा पक्षप्रवेश अजित पवार यांच्या लातूर शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील वाढत्या राजकीय स्वारस्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद
जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या दोन आमदार आहेत. त्यापैकी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच, उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे मागच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. आता दोन आमदार आणि मनपात दोन टर्म राहिलेले बडे नेते राष्ट्रवादीकडे आल्यामुळे, येणाऱ्या लातूर महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निर्णायक ठरणार का, याकडे आता संपूर्ण लातूर शहराचे लक्ष लागले आहे.