लातूर शहराच्या मध्यभागी ४५ मिनिटे जीव मुठीत! CNG गॅस गळतीमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:13 IST2025-11-10T13:10:04+5:302025-11-10T13:13:24+5:30
लातूरच्या गरुड चौकात थरार! सीएनजी टँकर लिकेजनंतर अग्निशमन दल व कंपनीच्या बचाव पथकाने ४५ मिनिटांत मोठा अनर्थ टाळला

लातूर शहराच्या मध्यभागी ४५ मिनिटे जीव मुठीत! CNG गॅस गळतीमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प
लातूर : शहरातील गरुड चौकानजीक नांदेड महामार्गावर रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक सीएनजी टँकर लिकेज झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या. वाहतूक थांबविली. नागरिकांना रोखले. अग्निशमन दल व कंपनीच्या बचाव पथकाने अर्ध्या तासात प्रेशर आटोक्यात आणले. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
लिकेज सुरू झाल्यानंतर अग्निशमनचे पथक आले. यावेळी प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ते होत नसल्याने दोन्ही बाजूचा रस्ता बंद करून सीएनजी स्वत:हून बाहेर सोडण्यात आले. त्यामुळे प्रेशर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सीएनजी हवेत लिक झाल्यास तत्काळ पेट घेत नाही. मात्र, शहराच्या मध्यभागी अशी घटना घडल्यास धोका बळावतो. त्यामुळे लातूर पोलिस, अग्निशमन व कंपनीच्या बचाव पथकाने उपाययोजना राबविल्या. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हा प्रकार ११:४५ वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आला. त्यामुळे वाहतूकही सुरळीत झाली. नागरिकांच्या मनातील भीतीही दूर झाली.