आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलांनीच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 13:38 IST2020-10-07T13:37:36+5:302020-10-07T13:38:16+5:30

वडील दारू पिऊन घरात भांडण करुन आईला सतत मारहाण करीत असल्याचा राग मनात धरून शिंदाळावाडी (ता. औसा) येथील दोघा भावांनी वडिलांचा खून केल्याची घटना मंगळवारी घडली. 

The children killed the father who beat his mother | आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलांनीच केला खून

आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलांनीच केला खून

बेलकुंड : वडील दारू पिऊन घरात भांडण करुन आईला सतत मारहाण करीत असल्याचा राग मनात धरून शिंदाळावाडी (ता. औसा) येथील दोघा भावांनी वडिलांचा खून केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी कृष्णा मच्छिंद्र गरड व त्याच्या भावावर भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, शिंदाळावाडी शिवारातील योगिता गरड यांच्या शेतात मच्छिंद्र काशीनाथ गरड (वय ४३) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. या घटनेची माहिती भादा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. 

यावेळी मयताच्या गळ्याला व मानेवर, डोळ्यावर जखमा आढळून आल्या. सदर व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात मयताचे वडील काशिनाथ गरड यांच्या फिर्यादीवरून कृष्णा मच्छिंद्र गरड याच्यासह भावावर कलम ३०२, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक करीत आहेत.

Web Title: The children killed the father who beat his mother