चाकूरात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 18:56 IST2018-08-27T18:55:40+5:302018-08-27T18:56:23+5:30
तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने शेळ्या- मेंढ्यांसह जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले़

चाकूरात आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचे आंदोलन
चाकूर (लातूर): राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात, या मागणीसाठी आज सकाळी चाकूर व देवणी तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने शेळ्या- मेंढ्यांसह जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले़ यावेळी गीतांच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी करण्यात आली़
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज चाकूर तहसील कार्यालयासमोर ढोल-जागर आंदोलन करण्यात आले. अनेक राज्यांत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश आहे. मात्र, महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे़ येत्या २१ सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अन्यथा ३० सप्टेंबर रोजी राज्यव्यापी धनगर आरक्षण एल्गार महामेळावा घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यानंतर तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात आरक्षण समितीचे तालुका समन्वयक गंगाधरराव केराळे, सुरेश हाके, दयानंद सुरवसे, अजित खंदारे, हणमंत शेळके, नारायण राजुरे, नामदेव मांडुरके, ज्ञानोबा हांडे, संतोष गडदे, सचिन एनकफळे, रमेश पाटील, सुरेश शेवाळे, गोविंद चिंचोळे, चंद्रकांत एनकफळे, लक्ष्मण केराळे, किशन वडारे, सुदर्शन येमे, संदीप एनकफळे, माधव खांडेकर आदी उपस्थित होते़