आत्महत्येस प्रवृत्त केले, दोन महिलांविरुद्ध गुन्हा; पाेलिसांत मुलीची तक्रार
By राजकुमार जोंधळे | Updated: February 8, 2025 23:01 IST2025-02-08T23:01:49+5:302025-02-08T23:01:49+5:30
उदगीर शहरातील घटना

आत्महत्येस प्रवृत्त केले, दोन महिलांविरुद्ध गुन्हा; पाेलिसांत मुलीची तक्रार
उदगीर : अंगावर भंडारा का टाकला? असे म्हणून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी उदगीर शहरातील मुक्कावार चौक येथे घडली हाेती. दरम्यान, मारहाण केल्याने फिर्यादीच्या आईने अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेतले. यात फिर्यादीची आई ८५ ते ९० टक्के भाजली. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत मयत महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात शनिवारी दोन महिलांविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, मयत संगीता नामदेव बिरादार (वय ४०, रा. फुलेनगर, उदगीर) या महिलेला भाग्यश्री उर्फ राणी दासू पिटाळे (रा. संजय नगर, उदगीर) आणि पद्मिनी उर्फ भाग्यश्री विजय साळुंके (रा. उदगीर) यांनी संगनमत करून १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ः३० वाजण्याच्या सुमारास मुक्कावार चौक परिसरात अंगावर भंडारा का टाकला? म्हणून शिवीगाळ केली. शिवाय, लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. झालेल्या मारहाणीच्या त्रासामुळे संगीता नामदेव बिरादार यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेतले. यामध्ये त्या ८५ ते ९० टक्के भाजल्या. त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत मयत महिलेची मुलगी संगीता बिरादार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन उदगीर शहर पाेलिस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.