अपघातग्रस्त कारनं पेट घेतला; सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 15:09 IST2019-05-28T15:07:02+5:302019-05-28T15:09:03+5:30
रात्री अपघात झालेल्या कारने सकाळी पेट घेतला

अपघातग्रस्त कारनं पेट घेतला; सहा जण जखमी
लातूर : जिल्ह्यातील लातूर - नांदेड महामार्गावरील भातखेडा गावाजवळ दोन कारचा अपघात झाला. सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातातील एका कारने मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ही कार जळून खाक झाली. या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ दत्ता पांचाळ (40) हे आपल्या कुटुंबासह पुण्याहून लातूर जिल्ह्यातील धामणगावकडे कारने (एम.एच. 17 व्ही. 3580) सोमवारी रात्री निघाले होते. त्यावेळी चाकूरहून लातूरकडे निघालेल्या भरधाव कारने (एम.एच. 14 एएम. 2549) पांचाळ यांच्या कारला जोरदार धडक दिली. सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर लातूरच्या शासकीय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोडवे यांनी सांगितले.