अवैध व्यवसायाविराेधात माेहीम; साडेतीन काेटींचा मुद्देमाल जप्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 21:47 IST2025-07-01T21:46:44+5:302025-07-01T21:47:03+5:30
५२० जणांविराेधात गुन्हा, १९ जणांना केले हद्दपार...

अवैध व्यवसायाविराेधात माेहीम; साडेतीन काेटींचा मुद्देमाल जप्त!
लातूर : नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, हिंगाेली आणि परभणी जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पाेलिस पथकांनी धाडी टाकल्या. यात तब्बल ७ काेटींचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दुसऱ्या टप्प्यात १ ते ३० जूनअखेर करण्यात आली. यात लातूर जिल्ह्यात ५२० जणांविराेधात गुन्हे दाखल केले असून, ३ काेटी ५० लाख १९ हजार ३३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अवैध दारु, मटका, जुगार, ऑनलाइन लाॅटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक आणि अवैध प्रवासी वाहतुकीविराेधात पाेलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार १ मे पासून अवैध व्यवसाय विराेधी अभियान सुरु करण्यात आले आहे.
पाेलिसांनी राबविलेल्या अवैध व्यवसायविराेधात अभियान १ दरम्यान अवैध व्यवसायात गुंतलेल्या १ हजार ७२१ आराेपींविराेधात १ हजार ५६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून एकूण ७ काेटी ७९ लाख ४७ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १ ते ३० जून या दरम्यान, अवैध व्यवसायाविराेधात अभियानाचा दुसरा टप्पा हाेता. यामध्ये २ हजार ३१६ जणांविराेधात २ हजारे १७ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ६ काेटी ९३ लाख ६० हजार ३६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अवैध वाळूविरुद्ध कारवाई; दीड काेटींचा मुद्देमाल जप्त.
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील उपविभागी पाेलिस अधिकाऱ्यांनी अहमदपूर हद्दीत अवैध वाळूविराेधात कारवाई केली. यावेळी त्यांनी वाहनांसह वाळूचा साठा असा एकूण तब्बल १ काेटी ४५ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जुलै महिन्यात अचानकपणे चार मासरेड केल्या जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.