औशात भाजपचा पॉवर शो! माजी आमदारांसह काँग्रेस-उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती कमळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:57 IST2026-01-27T19:56:43+5:302026-01-27T19:57:23+5:30
औशातील दिग्गज नेते आता भाजपात; माजी आमदारांपासून सरपंचांपर्यंत सर्वांनी धरलं कमळ

औशात भाजपचा पॉवर शो! माजी आमदारांसह काँग्रेस-उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती कमळ
-महेबूब बक्षी
औसा(लातूर): जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच औसा मतदारसंघात भाजपने विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या राजकीय 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे उद्धवसेना आणि काँग्रेसचे मोठे पदाधिकारी भाजपात सामील झाले आहेत. यामुळे औसा तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
मुंबईत झालेल्या एका विशेष सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये उद्धवसेनेचे गटाचे माजी आमदार दिनकरराव माने, संतोष सूर्यवंशी, आबासाहेब पवार यांच्यासह काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अमरसिंह भोसले यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांचे स्वागत केल्याने या प्रवेशाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
विरोधक संपवण्याची खेळी?
आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या कार्यकाळात आतापर्यंत दोनवेळा विरोधात राहिलेल्या माजी आमदारांना आपल्या गोटात खेचून आणण्यात यश मिळवले आहे. केवळ मोठे नेतेच नव्हे तर सरपंच, चेअरमन आणि व्यापारी वर्गालाही त्यांनी भाजपात आणले आहे. यामुळे औसा मतदारसंघात आता भाजपची पकड अधिक घट्ट झाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.