दोन वाहनांच्या शर्यतीत दुचाकीस्वारांचा हकनाक बळी; दोघांचा जागीच मृत्यू

By हरी मोकाशे | Updated: December 17, 2022 18:00 IST2022-12-17T17:59:48+5:302022-12-17T18:00:12+5:30

वानवडा मोडजवळील घटनेनंतर वाहनासह चालक फरार झाला आहे

Bike rider blown over by speeding vehicle; Both died on the spot | दोन वाहनांच्या शर्यतीत दुचाकीस्वारांचा हकनाक बळी; दोघांचा जागीच मृत्यू

दोन वाहनांच्या शर्यतीत दुचाकीस्वारांचा हकनाक बळी; दोघांचा जागीच मृत्यू

औसा (जि. लातूर) : औसा- तुळजापूर महामार्गावरील वानवडा मोडजवळ शनिवारी सकाळी ११. ३० वा.च्या सुमारास लातूरकडे निघालेल्या दुचाकीस्वारला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील एकाच्या अंगावरून चाक गेला, तर दुसऱ्याच्या डोक्यास जबर मार लागला. त्यामुळे दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

कल्याण उत्तम पाटील (गरड) (५२, हमु. तोरंबा) व श्रीमंत सदाशिव बागल (४८, रा. तोरंबा, ता. जि. उस्मानाबाद) अशी मयतांची नावे आहेत. कल्याण पाटील व श्रीमंत बागल हे तोरंबा येथून लातूरकडे मेहुण्याच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाकरिता दुचाकी (एमएच १३, बीसी ५०९९) वरुन शनिवारी सकाळी जात होते. तेव्हा वानवडा मोडजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात पाठीमागे बसलेल्याच्या डोक्यात जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. तर दुचाकी चालकाच्या शरीरावरुन वाहनाचे चाक गेल्याने त्यांचाही मृत्यू झाला. घटनास्थळी सपोनि ज्ञानदेव सानप, बीट अंमलदार औटी यांनी भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी ५ वा. पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दोन वाहनांची शर्यत दोघांच्या जीवावर बेतली...
शनिवारी सकाळी ११. ३० वा.च्या सुमारास बोरफळकडून औश्याकडे भरधाव वेगात जाणारी दोन वाहने एकमेकाला ओव्हरटेक करीत होती. या चढाओढीत रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या दुचाकीस्वारास वाहनाने उडविले. दोघांची पुढे जाण्याची शर्यत दोन कुटुंब प्रमुखांच्या जीवावर बेतल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: Bike rider blown over by speeding vehicle; Both died on the spot