पानटपरीवर गप्पातून वाद उद्भवून बंदुकीची गाेळी झाडून मित्राचा खून; आराेपीस जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:55 IST2025-07-31T16:49:01+5:302025-07-31T16:55:01+5:30
दहा हजारांचा दंड : लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पानटपरीवर गप्पातून वाद उद्भवून बंदुकीची गाेळी झाडून मित्राचा खून; आराेपीस जन्मठेपेची शिक्षा
लातूर : बंदुकीची गाेळी झाडून मित्राचा खून करणाऱ्या दाेषी आराेपीला लातूर येथील तिसऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांनी जन्मठेप आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाेठावली आहे. या प्रकरणात न्यायालयात एकूण १९ जणांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
सहायक सरकारी वकील व्ही. व्ही. देशपांडे यांनी बुधवारी सांगितले, आराेपी अमाेल ऊर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड ( ३०, रा. प्रकाशनगर, लातूर) याने त्याचा मित्र राहुल युवराज मनाडे (रा. वसवाडी, स्वराज नगर, लातूर) याचा बंदुकीने गाेळी झाडून खून केला हाेता. त्यानुसार मयताचा भाऊ विकास ऊर्फ विक्की युवराज मनाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. मयत राहुल मनाडे आणि आराेपी अमाेल ऊर्फ गणेश गायकवाड हे दाेघेही मित्र हाेते. ते दरराेज ५:३० वाजण्याच्या सुमारास एका पानटपरीवर गप्पा मारीत बसत. २४ सप्टेंबर २०१९ राेजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास दाेघेही एकत्र आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर मयत राहुलने त्याचा भाऊ फिर्यादी विकास ऊर्फ विक्की मनाडे यास फाेन करून सांगितले, मी लवकरच घरी येत आहे. त्यानंतर रात्री मयताचे मित्र फिर्यादीकडे आले. राहुल यास प्रकाश नगर येथे गाेळी घातल्याने राहुल गंभीर जखमी झाला आहे आणि त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. फिर्यादीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. राहुलच्या छातीत गाेळी लागल्याने जखम झाल्याचे आढळले.
सरकार पक्षाच्या वतीने १९ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. परिस्थितीजन्य पुरावे, सरकार पक्षाने पुराव्यांची साखळी सिद्ध केल्याने लातूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.टी. त्रिपाठी यांनी आराेपी अमाेल ऊर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड याला जन्मठेप व दहा हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील व्ही. व्ही. देशपांडे यांनी काम पाहिले. ॲड. परमेश्वर तल्लेवाड, ॲड. युवराज इंगाेले यांनी सहकार्य केले. न्यायालयीन पैरवी बी.टी. हिंगडे यांनी केली.