औसा-लामजना महामार्गावर रुग्णवाहिकेचा स्फोट, २२ लाखाचे नुकसान, रुग्णवाहिकेचा राहिला सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 20:00 IST2025-10-24T19:59:35+5:302025-10-24T20:00:00+5:30
चालकाच्या प्रसंगावधानामुळे रुग्णाचा जीव वाचला!

औसा-लामजना महामार्गावर रुग्णवाहिकेचा स्फोट, २२ लाखाचे नुकसान, रुग्णवाहिकेचा राहिला सांगाडा
महेबूब बक्षी/औसा- मध्यरात्री १२:४५ वाजता एका महिला रुग्णाला किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयातून लातूरला उपचारासाठी घेवून निघालेल्या १०८ रुग्णवाहिकेने अचानकपणे औसा-लामजना महामार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ पेट घेतला. मध्यरात्री आग विझविण्यासाठी धडपड करणाऱ्या चालकास यश आले नाही. काही मिनीटातच रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट झाला अन् रुग्णवाहिकेचा कोळसा होवून फक्त सांगाडा शिल्लक राहिला. या थरारक घटनेत चालक व सोबतच्या डॉक्टरने प्रसंगावधान दाखवून वेळीच आतील रुग्णाला बाहेर काढून सुरक्षित स्थळी थांबविल्याने जीवित हानी टळली. पण यात मात्र रुग्णवाहिकची राख झाल्याने सदरच्या अपघातात २२ लाखाचे नुकसान झाले असून किल्लारी पोलिसात आकस्मात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
२३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कार्ला येथे माहेरी आलेल्या महिलेला अचानकपणे चक्कर येणे, उच्चदाब वाढणे आदी होत असल्याने ती किल्लारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आली. पण तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्रथम तपासणी करुन रुग्णांची प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात रेफर केले. त्यावेळी १०८ ला फोन केल्यानंतर लामजना प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका रुग्णाला घेवून लातूरकडे निघाली. प्रवासादरम्यान चलबुर्गा पाटीजवळ येताच रुग्णवाहिकेच्या समोरील बाजूस काहीतरी जळाल्याचा दुर्गंधी येत होती. चालक गणेश माने यांनी पाहणी केली असता वायरिंग मध्ये पेट घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आग विझविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले, पण आग विझली नसल्याने सोबत असलेल्या डॉक्टरच्या मदतीने गाडीतील रुग्णाला सुरक्षित स्थळी थांबवून दोघांनी पुन्हा प्रयत्न केला. पण आगीने उग्र रूप धारण केले होते. त्यानंतर आतील असलेल्या दोन्हीही ऑक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट झाला अन् आगीच्या लाटा निघत होत्या. तब्बल तास दिड तास औसा -लामजना महामार्गावर आगीचा तांडव सुरु होता. यात भस्मसात झालेल्या रुग्णवाहिकेचा फक्त सांगाडा महामार्गालगत पडलेला दिसतोय. घटनास्थळांचा किल्लारी पोलिसांनी पंचनामा केला असून आकस्मात घटनेची नोंदणी केल्याची माहिती बिट आमंलदार आर.बी सांळुके यांनी दिली.
रुग्ण सुखरुप,दुसऱ्या रुग्णवाहिकेने सोडले रुग्णालयात
रुग्णवाहिकेत असलेली कार्ला येथे माहेरी आलेल्या अमृता हजारे महिला रुग्णाला डॉ.राहुल पवार व गणेश माने यांनी खाजगी वाहनात बसवले. वेळीच दुसऱ्या १०८ रुग्णवाहिकेस बोलावून त्यास सुखरूपपणे लातूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परिणामी त्या रुग्णावर वेळीच योग्य उपचार झाल्याने त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
अडिच महिन्यात दुसरी घटना, चिंताजनक बाब
रुग्णाला उपचारासाठी घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आग लागण्याची अडीच महिन्यात दुसरी घटना घडली आहे. यामुळे रुग्णासह डॉक्टर व चालकात चिंता व्यक्त केली जाते. जुलै महिन्यात औसा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेला आग लागली होती. ती घटना ताजी असताना कालच्या घटनेने रुग्णवाहिकेच्या फिटनेस बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काल आगीत भस्मसात झालेली रुग्णवाहिकेची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करण्यात आली होती.२०१३ ची रुग्णवाहिका असल्याने नेमके कारण काय याची चौकशी सुरू आहे. चौकशी नंतर नेमके कारण स्पष्ट होईल असे जिल्हा व्यवस्थापक विशाल गरड यांनी सांगितले.