लातुरात अग्नीतांडव, शॉर्टसर्किटने चार दुकाने खाक; चाळीस लाखांचे नुकसान !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:00 IST2022-03-10T15:58:14+5:302022-03-10T16:00:16+5:30
लातूर शहरातील रिंग रोडवरील वसंतराव नाईक चौकात असलेल्या चार गॅरेजच्या दुकानांना शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली.

लातुरात अग्नीतांडव, शॉर्टसर्किटने चार दुकाने खाक; चाळीस लाखांचे नुकसान !
लातूर : शहरातील वसंतराव नाईक चौकात शॉर्ट सर्किटमुळे चार दुकानांना आग लागल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. यात जवळपास ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
लातूर शहरातील रिंग रोडवरील वसंतराव नाईक चौकात असलेल्या चार गॅरेजच्या दुकानांना ९ ते १० मार्चच्या रात्री शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. दरम्यान, बघता - बघता या आगीने रौद्र रुप धारण केले. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी लातूर महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला दिली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, या दुकानांतील साहित्य पुर्णतः जळून खाक झाले असून, प्रत्येकी जवळपास ८ ते १० लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग शार्टसर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या आगीत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, दुकांनांचे साहित्य जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यातून दुकानदार अडचणीत आले आहेत. घटनास्थळी विवेकानंद चौक ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.