विवाहित महिलेचा खून करणाऱ्या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
By राजकुमार जोंधळे | Updated: November 15, 2022 20:14 IST2022-11-15T20:14:44+5:302022-11-15T20:14:56+5:30
लातूर जिल्ह्यातील हालकी शिवारातील घटना

विवाहित महिलेचा खून करणाऱ्या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर): तालुक्यातील हालकी येथील एका विवाहित महिलेची शेतात तीक्ष्ण हत्याराने वार करत खून करणाऱ्या आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी समाेर आली आहे. याबाबत शिरूर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, हालकी येथे सोमवारी सायंकाळी अर्चना राम बेवनाळे (वय ४०) या स्वत:च्या शेतात सोयाबीनची रास करत हाेते. दरम्यान, रास संपल्यावर पती राम बेवनाळे यांनी सोयाबीनचे पोते घरी नेण्यासाठी बैलगाडी आणताे म्हणून गेले. यावेळी अज्ञाताने धारदार हत्याराने गळ्यावर, मानेवर सपासप वार करून अर्चनाचा खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून ताे पसार झाला. याबाबत राम बेवनाळे यांनी बाळू ऊर्फ किशोर मारोती मोरे (वय ३० रा. हालकी) याच्याविराेधात शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक साेमय मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम यांनी भेट देऊन पाहणी केली हाेती. पाेलिसांना आरोपींच्या अटकेबाबतचे त्यांनी आदेश दिले. शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे पथक आरोपीच्या मागावर हाेते. दरम्यान, बाळू ऊर्फ किशोर मारोती मोरे याने घटनास्थळानजीकच्या शेतात चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी समाेर आली. घटनेची माहिती मिळताच सहायक पाेलिस निरीक्षक पंकज शिनगारे, पोउपनि. जिलानी मानुल्ला, मलवाडे, बिरादार, टिपराळे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीचा मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.