दीड वर्षांपासून फरार आराेपीला अटक, लातुरातील गांधी चाैक पाेलिस ठाण्याची कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: February 12, 2025 22:44 IST2025-02-12T22:43:51+5:302025-02-12T22:44:09+5:30
पाेलिसांनी सांगितले, विवेकानंद चौक ठाण्यात १७ जानेवारी २०२४ रोजी लातुरातील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तक्रार दिली हाेती.

दीड वर्षांपासून फरार आराेपीला अटक, लातुरातील गांधी चाैक पाेलिस ठाण्याची कारवाई
लातूर : दीड वर्षापासून फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला लातुरातील गांधी चाैक पाेलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे.
पाेलिसांनी सांगितले, विवेकानंद चौक ठाण्यात १७ जानेवारी २०२४ रोजी लातुरातील एका खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तक्रार दिली हाेती. दरम्यान, २६ जून २०२३ रोजी रुग्णालयातील १० लाख ४४ हजारांची उपकरणे दुरुस्तीसाठी संतोष मुरादे (रा. ओमकार हाईट्स, बीड) याला दिली हाेती. मात्र, त्याने ती उपकरणे परत न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल हाेताच आरोपी राहत्या पत्त्यावरून निघून गेला तेव्हापासून ताे सतत राहण्याची ठिकाणे बदलत पाेलिसांना गुंगारा देत हाेता.
याबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर शहर डीवायएसपी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस पथकाने चकवा देणाऱ्या आराेपीचा शोध घेतला. गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वातील पोलिस पथकाला गुन्ह्यातील फरार आरोपी हा अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन गांधी चौक ठाण्याचे सपोनि. सदानंद भुजबळ, पोउपनि. आक्रम मोमीन यांच्यासह राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, शिवा पाटील, संतोष गिरी, शैलेश सुडे यांनी आराेपींचा शाेध घेऊन त्याला अहिल्यादेवीनगर येथील पवननगर येथून ताब्यात घेतले. अधिक तपासासाठी विवेकानंद चौक ठाण्याच्या ताब्यात दिले आहे आहे.