अहमदपूर- उदगीर रस्त्यावर अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले
By हरी मोकाशे | Updated: September 30, 2022 18:44 IST2022-09-30T18:43:57+5:302022-09-30T18:44:14+5:30
अहमदपूर- उदगीर मुख्य रस्त्यावरील सुकणी ते वाढवणा पाटीदरम्यान झाला अपघात

अहमदपूर- उदगीर रस्त्यावर अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले
उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील सुकणी येथील एकजण रात्री अहमदपूर- उदगीर रस्त्यावरुन पायी जाताना पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात त्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुरुवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, सुकणी येथील सटवा दत्तू गोटमुकले (४९) हे बुधवारी रात्री ८ ते ८.३० वा. च्या सुमारास सुकणी येथून एका बंद असलेल्या धाब्यावर झोपण्यासाठी पायी जात होते. दरम्यान, अहमदपूर- उदगीर मुख्य रस्त्यावरील सुकणी ते वाढवणा पाटीदरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. मयताचे भाऊ राजकुमार गोटमुकले यांच्या फिर्यादीवरुन वाढवणा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.