कर्तव्यावर असलेल्या मोटार वाहन निरीक्षकास मारहाण; लातूरच्या RTO कार्यालयातील घटना
By आशपाक पठाण | Updated: September 13, 2022 17:19 IST2022-09-13T17:19:16+5:302022-09-13T17:19:22+5:30
लातूरमधील आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकास मारहाण करण्यात आली.

कर्तव्यावर असलेल्या मोटार वाहन निरीक्षकास मारहाण; लातूरच्या RTO कार्यालयातील घटना
लातूर: येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेल्या एका मोटार वाहन निरीक्षकास कर्तव्यावर असताना मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयातील वाहन फिटनेस तपासणीच्या ट्रॅकवर कार्यरत असलेल्या एका मोटार वाहन निरीक्षकासोबत काही महिला व सोबतच्या व्यक्तींनी बाचाबाची सुरू केली. यावेळी काहीजण भांडण सोडविण्यासाठी गेले. वादावादी सुरु असताना काही जणांनी मोटार वाहन निरीक्षकास धक्काबुक्की केली. ट्रॅकवरचा गोंधळ पाहून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये हे घटनास्थळी आले. त्यांनी संबधित कुटूंबाची समजूत काढली. दरम्यान, विवेकानंद चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी आरटीओ कार्यालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
कौटूंबिक वादातून घडला प्रकार
मोटार वाहन निरीक्षकास मारहाण करणारे त्यांच्या कुटूंबातील सदस्य आहेत. कौटूंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. कर्तव्यावर असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करुन मारहाण केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.