ट्रक- ऑटोच्या भीषण अपघातात ७ महिला मजूर ठार; कर्नाटकातील बीदरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 19:40 IST2022-11-05T19:39:43+5:302022-11-05T19:40:35+5:30
बिदर जिल्ह्यातील चिटगुप्पा तालुक्यातील बेमलखेडा गावाजवळ हा अपघात झाला असून मृत सर्व उदमनल्ली गावातील असल्याची माहिती बेमलखेडा पाेलीस ठाण्याचे पीएसआय शिवकुमार यांनी दिली.

ट्रक- ऑटोच्या भीषण अपघातात ७ महिला मजूर ठार; कर्नाटकातील बीदरमधील घटना
- बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि. लातूर) : महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यातील बेमलखेडा गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी ट्रक आणि ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. त्यात सात महिला मजूर ठार झाले तर सहा जण जखमी झाले.
बिदर जिल्ह्यातील चिटगुप्पा तालुक्यातील बेमलखेडा गावाजवळ हा अपघात झाला असून मृत सर्व उदमनल्ली गावातील असल्याची माहिती बेमलखेडा पाेलीस ठाण्याचे पीएसआय शिवकुमार यांनी दिली. उदमनल्ली गावातील मजूर शेजारील गावातील शेतशिवारात शुक्रवारी कामासाठी गेले होते. हे सर्व मजूर काम आटोपून सायंकाळी ऑटो (एपी २३, डब्ल्यू ९२५०) मधून घराकडे निघाले होते. दरम्यान, बेमलखेडा गावाजवळ समाेरुन येणारी ट्रक (टीएस ११, जीडी ०७५२) यांचा समाेरासमाेर भीषण अपघात झाला. त्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर मन्नाखळी येथील रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी बिदर येथील ब्रिम्स रुग्णालयात दाखल केले असता सहा महिलांचा मृत्यू झाला.
या अपघातात प्रभावती (३६), पार्वती (४०), गुंडम्मा (५२), मंजुळा (३२), रुक्मिणी (६०), जगदेवी (३८), ईश्वरी (४०, सर्वजण रा. उदमनल्ली, ता. चिटगुप्पा, जि. बीदर) हे ठार झाले आहेत. अपघातातील जखमी ६ जणांवर बिदर आणि मन्नाखेली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बेमलखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय शिवकुमार हे करीत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बाेम्मई यांनी दु:ख व्यक्त केले.