बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 00:56 IST2025-08-03T00:53:18+5:302025-08-03T00:56:41+5:30

लातूर शहरातील एका बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ माजली.

25-year-old bakery worker commits suicide, case registered against 6 people | बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर: शहरातील एका बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने बारा नंबर पाटी परिसरात एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, याबाबत एमआयडीसी ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना अटक केली असून, चौथा आरोपी १७ वर्षीय आहे. तिघांना शनिवारी लातूर न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी सांगितले, नांदेड जिल्ह्यातील देवापूर (ता. देगलूर) येथील रहिवासी असलेला तरुण प्रकाश यादव गाडीवान (वय २५) हा लातुरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बेकरीमध्ये सहा-आठ महिन्यापूर्वीपासून काम करत होता. दरम्यान, त्याला सारिका अशोक आयवळे (वय ३९, रा. बार्शी जि. सोलापूर, ह.मु. अतिरिक्त एमआयडीसी, हरंगुळ बु. ता. लातूर), सीमा सातलिंग वाघमारे (वय ३५, रा. हरंगुळ बु. ता. लातूर), दशरथ बलभीम तुपारे (वय ३५, रा. बोरगाव गणेश्वर ता. कळंब जि. धाराशिव), १७ वर्षीय मुलगा आणि इतर दोघा अनोळखींनी मोबाईलच्या कारणावरुन मारहाण केली होती. याच मारहाणीतून त्याने लातूर -बार्शी मार्गावरील बारा नंबर पाटील येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. याची माहिती शेतकऱ्याने एमआयडीसी पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोलिसांनी तातडीने भेट देत पंचमाना केला. यावेळी त्याच्या खिशात आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत सहा जणांनी मारहाण केल्याचे मयत प्रकाश गाडीवान याने म्हटले आहे. याबाबत मयताचा भाऊ रघुनाथ यादव गाडीवान (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सारिका आयवळे, सीमा वाघमारे, दशरथ तुपारे, एक अल्पवयीन मुलगा आणि इतर अनोळखी दोघे अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चौघांपैकी तिघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांना शनिवारी दुपारी लातूर येथील न्यायलयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक एस.एम. मोरे हे करीत आहेत.

अनोळखी दोन आरोपी; अटकेसाठी पोलिस मागावर...
आत्महत्या करण्यापूर्वी मयत तरुणाने चिठ्ठीत नमूद केलेल्या सहा नावांपैकी दोघे अनोळखी आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोघांना अटक केल्यानंतर काही संदर्भ, धागेदोरे हाती लागतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: 25-year-old bakery worker commits suicide, case registered against 6 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.