लातूर : धाराशिव, लातूर आणि पुणे जिल्ह्यातून दुचाकी पळविणाऱ्या टाेळीतील एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल २४ दुचाकी (किंमत ८ लाख २० हजार) जप्त केल्या. चाैकशीत १७ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
लातूरसह जिल्ह्यातील वाहनचाेरीबाबत तपासाचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले हाेते. त्यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले हाेते. दरम्यान, गुन्हेगारांचा डेटा संकलित करताना माहिती मिळाली. दुचाकी चाेरणाऱ्या टाेळीतील अमोल नागरवाड हा चाेरीच्या दुचाकी राहत्या घरासमोर लपवून ठेवला आहे. अशी माहिती पाेलिसांना खबऱ्याने दिली. याच्या आधारे थोरलेवाडी (ता. अहमदपूर) येथे पाेलिस पथक धडकले. दुचाकीसह रस्त्यावर थांबलेला अमोल तेजराव नागरवाड (वय २५) याला ताब्यात घेतले. लपवून ठेवलेल्या दुचाकीबाबत अधिक विचारपूस केली. या दुचाकी लातूर, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून चाेरल्याची कबुली त्याने दिली.
ही कारवाई स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, पाेउपनि. संजय भोसले, अंमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, युवराज गिरी, मनोज खोसे, गोविंद भोसले, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकान केली.
लातूर जिल्ह्यातून १३ दुचाकींची चाेरी... -चाकूर ठाण्याच्या हद्दीतून ४ दुचाकी, शिरूर अनपाळ - ३ दुचाकी, रेणापूर, देवणी, निलंगा, विवेकानंद चाैक, गांधी चौक, अहमदपूर ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येक एक दुचाकी, पुणे जिल्ह्यातील ३ आणि धाराशिव जिल्ह्यातून एक अशा एकूण १७ दुचाकी चाेरीचा उलगडा झाला. उर्वरित सात दुचाकींबाबत तपास सुरु आहे. अटकेतील आराेपीला चाकूर पाेलिसांच्या स्वाधीन केले आहे.