वारकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे वैद्यकीय पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 13:31 IST2019-07-03T13:28:21+5:302019-07-03T13:31:22+5:30
पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे विशेष वैद्यकीय पथक रवाना झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीमध्ये हे पथक मंगळवारी रवाना करण्यात आले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने वारकऱ्यांसाठी वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, वारकरी उपस्थित होते.
कोल्हापूर : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोल्हापूरजिल्हा परिषदेचे विशेष वैद्यकीय पथक रवाना झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या उपस्थितीमध्ये हे पथक मंगळवारी रवाना करण्यात आले.
आषाढी यात्रेसाठी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला चालत जात असतात. सलग १५/२0 दिवस चालल्याने या वारकऱ्यांच्या पायात गोळे येणे, जांघेत गाठ येणे, पाय दुखणे, ताप येणे असे प्रकार होतात; त्यामुळे यावेळी प्राथमिक उपचार आणि साथ प्रतिबंधक सेवा, पोट विकार पाणी शुद्धीकरण तसेच अत्यावश्यक सेवा, संदर्भसेवा आवश्यक असते.
गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसांठी आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य पथक पाठविले जाते. जिल्हा परिषद, कोल्हापूरमार्फत आरोग्य पथक पाठविण्यात येत आहे. डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखालील पथक नृसिंहवाडी, जयसिंगपूर, मिरजमार्गे पंढरपूरला जाणार आहे, तर डॉ. अरुण गवळी यांच्या नेतृत्वाखालील पथक मिरज, लोणंद, नातेपुते, माळशिरस, वेळापूरमार्गे पंढरपूरला जाणार आहेत. गेल्यावर्षी या पथकांनी सहा हजार वारकऱ्यांवर उपचार केले होते.
यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, एम. एम. पाटील. मार्केट यार्ड येथील विठ्ठल मंदिर प्रमुख वारके आण्णा, येवती येथील दिंडीप्रमुख बी. डी. पाटील, रंगा वायदंडे, घुले उपस्थित होते. या पथकामध्ये आरोग्य साहाय्यक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, वाहनचालक या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
वारकऱ्यांच्या वेशात मित्तल
यावेळी अमन मित्तल यांच्या कपाळाला बुक्का लावण्यात आला होता. तसेच त्यांना डोक्यावर गांधी टोपी घालायला दिली होती. त्यांच्या गळ्यामध्ये वीणाही देण्यात आली होती. वारकऱ्यांच्या वेशामध्ये मित्तल यांनीही हा आनंद घेतला.