Zilla Parishad schools will be provided with oximeters and thermal guns | जिल्हा परिषदेच्या शाळांना ऑक्सिमीटर, थर्मल गन देणार

जिल्हा परिषदेच्या शाळांना ऑक्सिमीटर, थर्मल गन देणार

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या शाळांना ऑक्सिमीटर, थर्मल गन देणार अमन मित्तल, शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांशी चर्चा

कोल्हापूर : डिसेंबर महिन्यात प्राथमिक शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्याशाळांना ऑक्सिमीटर आणि थर्मल गन देणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी मित्तल यांची भेट घेऊन त्यांच्याशी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा केली.

मित्तल म्हणाले, २३ नोव्हेंबरपासून माध्यमिक शाळा सुरू करण्यात येणार आहेत. ५ डिसेंबरनंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राथमिक शाळा सुरू करण्यात येतील. सर्दी, ताप असलेल्या शिक्षकांनी क्वारंटाईन व्हावे. शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही. मात्र पालकांची संमती असेल तर अडचण नाही. शाळाखोल्या, वर्ग, व्हरांडा येथे किती विद्यार्थी बसू शकतील याचा विचार करून किती सत्रात शाळा भरवावी लागेल, याचे नियोजन केले जावे.

खासगी शाळांनी मुलांना तपासण्यासाठीचे सर्व साहित्य खरेदी करावयाचे आहे. शाळा सॅनिटायझेशन करून घेण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. यावेळी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनीही शाळा सुरू करण्यासाठी सर्व शिक्षक सकारात्मक असून शिक्षकांच्याही आरोग्याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेत राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, संभाजी बापट, गौतम वर्धन, सतीश बरगे, सुकुमार पाटील, गजानन कांबळे, तानाजी घरपणकर, भरत रसाळे व माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Zilla Parishad schools will be provided with oximeters and thermal guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.