पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी ठरली जीवघेणी, वाहनाच्या धडकेत युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:18 IST2018-11-12T14:14:41+5:302018-11-12T14:18:08+5:30
कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील पडवळवाडी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. रोणक रविंद्र जाधव (वय २९, रा. दत्तनगर, शिंगणापूर रोड, फुलेवाडी) असे त्याचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी करुन घरी येत असताना हा अपघात घडला.

पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी ठरली जीवघेणी, वाहनाच्या धडकेत युवक ठार
कोल्हापूर : कोल्हापूर-पन्हाळा रोडवरील पडवळवाडी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत महाविद्यालयीन युवक जागीच ठार झाला. रोणक रविंद्र जाधव (वय २९, रा. दत्तनगर, शिंगणापूर रोड, फुलेवाडी) असे त्याचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी करुन घरी येत असताना हा अपघात घडला. पन्हाळ्यावर मित्रांसोबत पार्टी जीवघेणी ठरली.
अधिक माहिती अशी, रोणक जाधव हा न्यू कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याचे वडील दाजिपूर वन विभागात अधिकारी आहेत. तो शनिवारी मित्रांसोबत दूचाकीवरुन पन्हाळ्याला गेला. जाताना त्यांनी पन्हाळ्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. तसा निरोपही त्याने घरी दिला होता.
पन्हाळ्यावर पार्टी झालेनंतर हा एकटाच काम आहे म्हणून घरी जाण्यासाठी निघाला. दूचाकीवरुन येत असताना पडवळवाडी येथे अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या लोकांनी करवीर पोलीसांना वर्दी दिली.
पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. खिशातील ओळखपत्रावरुन रोणकची ओळख पटली. नातेवाईक, मित्रांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद करवीर पोलीसांत झाली आहे. शिवाजी पुलावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.