Kolhapur News: कुंभी नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू, मृतदेह सापडला; कुडित्रे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 17:45 IST2023-03-13T17:45:34+5:302023-03-13T17:45:56+5:30
विजय सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला असता त्याची दुचाकी व कपडे सांगरुळ बंधाऱ्यावर आढळून आले.

Kolhapur News: कुंभी नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू, मृतदेह सापडला; कुडित्रे येथील घटना
प्रकाश पाटील
कोपार्डे : कुंभी नदीत सांगरुळ बंधाऱ्याजवळ आंघोळीसाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विजय दामोदर पडवळ (वय ३०, रा. कुडित्रे, ता. करवीर) असे या मृत तरूणाचे नाव आहे.
काल, रविवारी (दि.१२) त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान, आज सोमवारी (दि.१३) त्याचा मृतदेह पाणबुड्याच्या साहाय्याने शोधण्यात यश मिळाले. कोपार्डेचे पोलीस पाटील जालिंदर जामदार यांनी करवीर पोलिसांकडे या घटनेची नोंद केली होती.
याबाबत माहिती अशी, विजय पडवळ काल रविवारी शेतात तणनाशक फवारणी करून घरी आला होता. दुपारच्या सुमारास तो कुंभी नदीवर असणाऱ्या सांगरुळ बंधाऱ्याजवळ आंघोळीसाठी गेला होता. विजय सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला असता त्याची दुचाकी व कपडे सांगरुळ बंधाऱ्यावर आढळून आले.
विजयला पोहता येत नसल्याने तो बुडाल्याचा संशय व्यक्त होत होता. नातेवाईक व ग्रामस्थांच्या साहाय्याने पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती. पण अंधार पडल्याने ती थांबवण्यात आली. आज सकाळ पासून जीवनरक्षक उदय निंबाळकर व टीमने पुन्हा शोध मोहीम सुरू केली होती. तब्बल चार तासानंतर विजयचा मृतदेह शोधण्यात यश आले.
विजय हा अल्पभूधारक असल्याने दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करुन कुटुंबाचा गाडा चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व आई असा परिवार आहे.