तरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, कोल्हापुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठा साठा उघड

By सचिन यादव | Updated: June 9, 2025 18:01 IST2025-06-09T18:01:24+5:302025-06-09T18:01:39+5:30

सचिन यादव कोल्हापूर : सिगारेटची जागा आता ई-सिगारेटने घेतली. वेब सिगारेट नाव नवीन नसले तरी जिल्ह्यातील अनेक तरुण या ...

Youth addicted to e cigarettes, huge stockpile uncovered in police operation in Kolhapur | तरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, कोल्हापुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठा साठा उघड

तरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, कोल्हापुरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठा साठा उघड

सचिन यादव

कोल्हापूर : सिगारेटची जागा आता ई-सिगारेटने घेतली. वेब सिगारेट नाव नवीन नसले तरी जिल्ह्यातील अनेक तरुण या ई-सिगारेटच्या आहारी गेले आहेत. ७५० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत याच्या किमती असून, या सिगारेटच्या विळख्याची व्याप्ती वाढू लागली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पथक आणि शाहूपुरी पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात साठा असल्याचे उघड झाले आहे.

ज्या सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई-सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट’ ओळखली जाते. तंबाखूजन्य सिगारेट न ओढता तंबाखूत असलेले निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून याचा वापर केला जातो. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. आता नवीन जी वेब सिगारेट आली आहे ती पेनड्राइव, पेन, लायटरच्या आकाराची आहे. ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातले निकोटिन आहे. ही सिगारेट पेटविण्यासाठी लायटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो.

जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही. यामुळे सिगारेट ओढल्याची निशाणी राहत नसल्याने महाविद्यालयीन तरुण आहारी जात आहेत.

  • तरुणांना इलेक्ट्रॉनिक सिगारेटचे व्यसन
  • शाळा, महाविद्यालयांतील तरुण जाळ्यात
  • तंबाखू नव्हे तर थेट द्रवरूपातील निकोटिन


तरुणाई विळख्यात

दुर्दैवाने तरुणाई या व्यसनात गुरफटत आहे. सर्वसाधारणपणे हुक्क्याप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सची जत्रा वेब सिगारेटमध्ये असते. आकर्षणापोटी तर कधी मौजमजेसाठी हजारो रुपये खर्चून घेतली जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट होत आहे.

धोकादायक द्रव्ये

द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाऊन धूम्रपानासाठी वापर केला जातो. यामध्ये ई-सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई-शिशा आदी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे. हे सर्व शरीराला अपायकारक असलेली द्रव्ये आहेत.

कायद्याने अशा प्रकारच्या ई-सिगारेट वापरावर, विक्रीवर बंदी आहे. त्याची विक्री केल्याप्रकरणी न्यू शाहूपुरीतून एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्या सी झोन दुकानातून चार लाखांचा सिगारेटचा साठा जप्त केला. - संतोष डोके, शाहुपूरी पोलिस निरीक्षक

तरुणाईत ई-सिगारेट ओढण्याची स्टाईल बनत चालली आहे. मात्र त्याचा आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका आहे. श्वसनाचे रोग झालेले रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर ई-सिगारेटच्या आहारी गेल्याचे सांगतात. - डॉ. अशोक पाटील
 

Web Title: Youth addicted to e cigarettes, huge stockpile uncovered in police operation in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.