योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक, महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त पदी बदली
By उद्धव गोडसे | Updated: May 22, 2025 18:43 IST2025-05-22T18:42:14+5:302025-05-22T18:43:19+5:30
उद्धव गोडसे कोल्हापूर : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त पदी बदली झाली. त्यांच्या जागी नांदेड ...

योगेश गुप्ता कोल्हापूरचे नवे पोलिस अधीक्षक, महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त पदी बदली
उद्धव गोडसे
कोल्हापूर : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहर पोलिस उपआयुक्त पदी बदली झाली. त्यांच्या जागी नांदेड येथील मानवी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची नियुक्ती झाली. गुप्ता हे सध्या हैदराबाद येथील प्रशिक्षणात असून, लवकरच ते कोल्हापूर पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. राज्यातील २२ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचा आदेश गृह विभागाने गुरुवारी (दि. २२) जारी केला.
योगेश गुप्ता हे २०१२ च्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशिक्षणानंतर मुंबई, हिंगोली, परभणी येथे त्यांनी सेवा बजावली. मुंबईत जलद कृती दलाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यानंतर नांदेड येथे नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते. सध्या ते हैदराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. ते लवकरच कोल्हापूर अधीक्षक पदाचा कार्यभार घेणार आहेत. लोकाभिमुख काम करून पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मे २०२३ मध्ये कोल्हापूरचा कार्यभार स्वीकारला होता. गेल्या दोन वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याचे काम त्यांनी केले. शहरातील जातीय दंगलीसह विशाळगड येथील दंगल काळात त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासह सराईत गुन्हेगारांना तडीपार, हद्दपार करणे आणि पोलिस दलातील प्रशासकीय कामांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. नूतन अधीक्षक गुप्ता कोल्हापुरात हजर झाल्यानंतर पंडित ठाणे येथील उपआयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.