कोल्हापूर जिल्ह्याला दोन दिवस ‘यलो अलर्ट’, मंगळवारपर्यंत जोरदार पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 16:36 IST2025-10-27T16:35:14+5:302025-10-27T16:36:32+5:30
रविवारी दिवसभर रिपरिप, अनेक ठिकाणी जोरदार

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर अन् आज, सोमवार सकाळपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हा पाऊस सुरू असून, मंगळवारपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जिल्ह्यासाठी दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे.
पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैऋत्यला ४०० किलोमीटर अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. आगामी पाच दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र उत्तर व ईशान्यकडे मार्गक्रमाणची शक्यता आहे. आग्नेय बंगाल उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे आज, सोमवारी मध्य बंगाल उपसागारात मार्गक्रमण होऊन तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. त्यामुळे उद्या, मंगळवारी तीव्रचक्रीवादळात रूपांतर होण्याच्या शक्यतेमुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तविली आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी कोल्हापुरात पावसाची रिपरिप राहिली. दुपारी काहीसी उसंत घेतल्यानंतर सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसाचा पिकांना फटका बसत आहे. दिवाळीच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांची रविवारी पडलेल्या पावसामुळे खूप तारांबळ उडाली.