कोल्हापुरात एक्स बॅन्ड डॉप्लर रडार, पावसाचा अचूक अंदाज कळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:14 IST2025-01-21T12:13:34+5:302025-01-21T12:14:10+5:30
पंतप्रधान मोदींनी नुकतीच केली घोषणा

कोल्हापुरात एक्स बॅन्ड डॉप्लर रडार, पावसाचा अचूक अंदाज कळणार
सतीश पाटील
कोल्हापूर : पंचगंगा आणि कृष्णा खोऱ्यात महापूर रोखण्यासाठी आणि पावसाचा अचूक अंदाज कळण्यासाठी एक्स बॅंड डॉप्लर रडार कोल्हापूरला मिळणार आहे. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मौसम अंतर्गत १४ जानेवारी २०२४ रोजी केल्याची माहिती नाशिकचे शास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी लोकमतला दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, भारतीय मौसम विज्ञान विभाग आय एम डी अंतर्गत आतापर्यंत पावसाची माहिती आणि अंदाज समजत आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डॉप्लर रडार बसवलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा किती पाऊस पडणार आहे. याची अचूक माहिती मिळू शकते जर २०१९, आणि २०२१ सारखी अतिवृष्टी झाली तर ती आपल्याला आगोदर कळेल, पावसामुळे होणारे नुकसान, जिवीतहानी टाळता येईल.
२०१० पूर्वीपासून महाराष्ट्रात एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स डॉप्लर रडार नेटवर्क स्थापण्यासाठी नाशिकचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार जोहरे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश आले असून महाराष्ट्रासाठी ५ नवीन एक्स-बॅंड (८-१२ गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी) डॉप्लर रडार बसवण्याची घोषणा पंतप्रधान मोदीनी केली. डॉप्लर रडार यंत्रणा मंजूरी बाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधला असता. अद्याप केंद्र शासनाकडून कोणताही पत्रव्यवहार किंवा सुचना आलेली नाही असे सांगितले.
कोल्हापूरसह नाशिक, पुणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर अशा ५ ठिकाणी डाॅपलर रडार यंत्रणा मंजूर करण्यात आली आहे. १४ जानेवारी २०२५ रोजी मिशन मौसम अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मंजूर केल आहे. गेल्या १४ वर्षांपासून आपण याचा पाठपुरावा करत होतो. - प्रा. किरणकुमार जोहरे, आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक व ढगफुटी तज्ज्ञ