कोल्हापुरातील अंबाबाई भक्तनिवासाचे काम रखडले.. जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:45 IST2025-07-31T15:44:44+5:302025-07-31T15:45:05+5:30
सहा महिन्यांची डेडलाइन: सहा वर्षे काम रेंगाळले

कोल्हापुरातील अंबाबाई भक्तनिवासाचे काम रखडले.. जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला फटकारले
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने ताराबाई रोडवर सुरू असलेल्या भक्तनिवासचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. या कामात सातत्याने काॅन्ट्रॅक्टरकडून दिरंगाई केली जात असल्याने बुधवारी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी पुढील सहा महिन्यांत इमारत तयार झाली पाहिजे, असा दमच भरला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने खरेदी केलेल्या महालक्ष्मी बँकेच्या जागेवर सात मजली इमारती बांधली जात आहे. पहिले तीन मजले पार्किंगसाठी आणि वरचे चार मजले भक्त निवास करण्यात येत आहे. यासाठी साधारण साडेतीन कोटींचा निधी दिला असून याचा ठेका पॅराडाईज डेव्हलपरला देण्यात आला आहे. सन २०१९ मध्ये ठेका दिला गेला. त्यानंतर कोरोनामध्ये दोन वर्षे गेली. पण कोरोना संपूनही चार वर्षे झाली तरी ठेकेदाराने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले नाही.
यापूर्वी देवस्थान समितीने वारंवार ठेकेदाराला नोटिसा पाठवल्या आहेत. पण त्याचाही परिणाम झालेला नाही. अखेर बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी देवस्थानचे अभियंता व ठेकेदाराला बोलावून काम कुठपर्यंत आले आहे याची विचारणा केली व पुढील सहा महिन्यात इमारत पूर्ण झाली पाहिजे, अशी डेडलाइनच दिली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांचे तरी ठेकेदार ऐकतात का ते पाहावे लागेल.