Kolhapur: म्हाकवेतील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 14:07 IST2024-06-03T14:06:01+5:302024-06-03T14:07:42+5:30
दत्ता पाटील म्हाकवे: म्हाकवे ता. कागल येथील आनंदी शंकर पाटील (वय ६६) यांना राञी १२:३० वाजता झोपेत असतानाच सर्पदंश ...

Kolhapur: म्हाकवेतील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
दत्ता पाटील
म्हाकवे: म्हाकवे ता. कागल येथील आनंदी शंकर पाटील (वय ६६) यांना राञी १२:३० वाजता झोपेत असतानाच सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत कष्टप्रद जीवन व्यतीत केलेल्या शेतकरी कुटुंबातील आनंदी यांच्या मृत्यूने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
रात्रीचे जेवण करून झोपी गेलेल्या आनंदी यांना राञी साडेबारा वाजता आपल्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. त्यांनी आरडाओरड करताच अंथरुणानजीक चाचपणी केली. यावेळी घोणस जातीचे लहान पिल्ले आढळून आले. त्यांना उपचारासाठी कागल येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. माञ, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, आपल्याला साप चावला असल्याचे समजल्याने भीतीपोटी त्यांना मानसिक धक्का बसला असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.